युती न करता काँग्रेसने स्वबळावर लढावे: फ्रान्सिस सार्दिन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

कामत हे पाच जणांच्या कॉंग्रेस विधिमंडळ गटाचे नेते आहेत. विधानसभा अधिवेशनात या पाच जणांनी एकमेकांना अलिंगने द्यावीत, पाठिंबा द्यावा. पण, निवडणुकीतील रणनीती ठरवण्याचा निर्णय पक्ष घेणार आहे.

मडगाव: आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी मगो व गोवा फॉरवर्ड सोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आगामी निवडणुकीत कॉंग्रेसने कोणाशी युती न करता निवडणूक स्वबळावर लढवावी, असे मत व्यक्त केले आहे.

 

कामत हे पाच जणांच्या कॉंग्रेस विधिमंडळ गटाचे नेते आहेत. विधानसभा अधिवेशनात या पाच जणांनी एकमेकांना अलिंगने द्यावीत, पाठिंबा द्यावा. पण, निवडणुकीतील रणनीती ठरवण्याचा निर्णय पक्ष घेणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार किंवा विरोधी पक्षनेता हा निर्णय घेऊ शकत नाही, असे सार्दिन यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. दक्षिण गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस यावेळी उपस्थित होते.

 

कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची व जनतेची भावना आहे. भाजपला सर्व आघाड्यांवर अपयश आलेले आहे. जनता भाजपच्या कारभाराला कंटाळली असून जनता पुन्हा कॉंग्रेसला सत्तेत आणणार आहे. मागच्या निवडणुकीतही गोव्याच्या जनतेने कॉंग्रेसने सर्वाधिक १७ जागा दिल्या होत्या, असे सार्दिन यांनी सांगितले.

 

कॉंग्रेसला मागच्या निवडणुकीनंतर धडा मिळालेला असल्याने कॉंग्रेस आगामी निवडणुकीत युती करणार नाही. कॉंग्रेसची साथ न करता भाजपला सत्तेत आणलेल्या पक्षांसोबत युती करू नये, अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे, असे सार्दिन यांनी सांगितले. निवडणुकीला अजून बराच वेळ असून तोपर्यंत पक्षसंघटना बळकट करता येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

 

गटाध्यक्ष निवडीबाबत इशारा

कॉंग्रेसच्या काही गटाध्यक्षांची निवड अलिकडेच जाहीर करण्यात आली. जाहीर झालेल्या गटाध्यक्षांपैकी सर्वानाच मी ओळखत नाही. लोकसभा निवडणुकीत या सर्वांनी कॉंग्रेसच्या प्रचारकार्यात भाग घेतला असेल असे मी मानतो. यापैकी एखादा कॉंग्रेसचे कार्यकर्ता नसल्यास गट समितीच्या बैठकीत त्याला कार्यकर्त्यांकडून घेराव घालण्यात येईल, असा इशारा सार्दिन यांनी दिला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या