आगामी निवडणूकीत गोवा कॉग्रेस देणार नव्या दमाच्या नेत्यांना संधी

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

आगामी विधानसभा निवणडणुकीत काँग्रेस युवकांवर भर देणार असून २५ ते ३० नव्या दमाच्या युवा नेत्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे जाहीर केले. 

मडगाव: आगामी विधानसभा निवणडणुकीत काँग्रेस युवकांवर भर देणार असून २५ ते ३० नव्या दमाच्या युवा नेत्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे जाहीर केले. 
माजी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव व त्यांचे पुत्र युरी आलेमाव यांना मडगाव येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यावेळी चोडणकर यांनी ही घोषणा केली. 

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी मागच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबले होते. त्यांचीच ही परंपरा पुढे नेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना युवकांवर भर देण्यात येणार आहे. युवकांना उमेदवारी द्यावी ही लोकभावना असून या भावनेचा काँग्रेस पक्ष आदर करणार आहे, असे चोडणकर यांनी सांगितले. 

काही पक्ष हे भाजपचे अ, ब व क संघ असून हे पक्ष भाजपला सत्तेत येण्यास मदत करतात. निवडणुकीपूर्वी भाजपला विरोध करणारा एक पक्ष निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत असतो, अशी टीका चोडणकर यांनी केली. 

आम आदमी पार्टीमुळे (आप) चार ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले. आप हा भाजपचा ब संघ असून हा पक्ष भाजपला विरोध करण्यासाठी नव्हे, तर काँग्रेसचे नुकसान करण्यासाठीच निवडणुकीत उतरतो, असा आरोप चोडणकर यांनी केला. 
आगामी निवडणुकीत काँग्रेस पूर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आणखी वाचा: 

गोव्यातही राष्ट्रवादीचे समर्थक

 

संबंधित बातम्या