काँग्रेस कोणाशीही युती करणार नाही

Congress will not ally with anyone
Congress will not ally with anyone

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड या पक्षांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूकपूर्व युती करण्याची शक्यता कॉंग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी फेटाळली. राज्याच्या चाळीसही मतदारसंघात पक्ष संघटना बळकट केली जाणार आहे. त्यामुळे युती करण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना पत्रकार परिषदेत नमूद केले.

दोन दिवसांचा गोवा दौरा आटोपता घेण्यापूर्वी येथील कॉंग्रेस मुख्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, २०१७ मध्ये गोमंतकीय मतदारांनी सर्वाधिक मते कॉंग्रेसला दिली होती. आम्ही आता प्रत्येक मतदान केंद्रावर पक्ष संघटना बळकट करणार आहोत. काहीतरी लाभासाठी भाजपसोबत कधी ना कधी सत्ता उपभोगलेल्या या दोन्ही स्थानिक पक्षांना कॉंग्रेस सोबत घेणार नाही. भाजपच्या सरकारने गोमंतकीय जनतेला फसवले आहे. कोविड गैरव्यवस्थापन, कुप्रशासन याच्या चर्चा सार्वत्रिक आहे. मंत्री केवळ लुटण्यासाठी व्हावे हाच हेतू दिसत आहे. सत्तेसाठी हापापल्या भाजपने गोव्यात जनतेचा मतादेश धुडकावला आहे. कर्नाटक, मध्यप्रदेशात त्यांनी हे केले आहे, राजस्थानात त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला, महाराष्ट्रात प्रयत्न सुरु आहेत. भावनिक व धर्माचे राजकारण करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. हे चित्र पालटवले गेले पाहिजे.


पक्षातून इतरत्र गेलेल्या आमदारांना परत घेणार का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, पक्षाने त्यांच्याविरोधात अपात्रता याचिका सभापतींसमोर आणि त्या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जिल्हा समित्या आणि प्रदेश कार्यकारीणीने त्यांना पून्हा पक्ष प्रवेश देऊ नये असे ठराव संमत केले आहेत. त्या ठरावांचा आदर केला जाईल.


येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर १० सदस्यीय समित्या नेमण्यात येणार आहेत. डिसेंबरमध्ये मतदान केंद्र समिती अध्यक्षांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रदेश कार्यकारीणीची फेररचना करून ती अधिक कार्यक्षम केली जाणार आहे. किसान अधिकार दिवस कार्यक्रम म्हापसा व मडगाव येथे ३१ ऑक्टोबरला आयोजित केले जाणार आहेत. ५ नोव्हेंबरला अत्याचार प्रतिबंधक दिन पाळण्यात येईल. ८ नोव्हेंबरला डिचोली ते मांद्रे अशी ट्रॅक्टर फेरी काढण्यात येईल. १४ नोव्हेंबरला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग वाचवा मोहिम राबवण्यात येईल.


लोहमार्गाच्या दुपदरीकरणाच्या विरोधात मत व्यक्त करताना ते म्हणाले, स्थानिक नेत्यांनी याविषयी मते यापूर्वीच व्यक्त केली आहेत, तेच पक्षाचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल घेतली आहे. प्रत्येकाने पक्षशिस्त पाळली पाहिजे. पक्षांतर्गत बाबी सार्वजनिकरीत्या न सांगता पक्षाच्या मंचावरच व्यक्त केल्या पाहिजेत. आता आम्ही संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे अशी माहिती त्यांनी विविध प्रश्नांवर बोलताना दिली.


यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे विधीमंडळ गटनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष एम. के शेख, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष ज्यो डायस, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

‘म्हादईप्रश्नी पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी’
म्हादईबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना कर्नाटकातील दिनेश गुंडूराव म्हणाले, प्रत्येक राज्याला आपला अधिकार मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. गोवा, महाराष्‍ट्र व कर्नाटक ही राज्ये या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात गेली आहेत. तेथेच या विषयाचा निवाडा होऊ द्या. हा विषय तिन्ही राज्यांसाठी महत्वाचा आणि तेथील जनतेसाठी संवेदनशील आहे. या प्रश्नात पंतप्रधान मध्यस्थी करू शकतील. स्व. इंदिरा गांधी यांनी या पद्धतीने तमिळनाडूतील प्रश्न सोडवला होता.

पक्षांतर करणाऱ्यांवर पक्षश्रेष्ठी 
निर्णय घेतील ः प्रतापसिंह राणे
पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे म्हणाले, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मी काही सूचना केल्या आहेत. पक्षांतर केलेल्यांबाबत काय निर्णय घ्यायचा हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. माझी अल्प काळासाठी त्यांच्याशी भेट झाली. यादरम्यान पक्ष संघटनेवरच प्रामुख्याने चर्चा झाली.  

काँग्रेसमध्ये कोणीही परत  येऊ शकतो -सार्दीन
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दीन म्हणाले, आम्ही सारे आता पक्ष बळकटीसाठी एकवटलो आहोत. गेल्या वेळी सर्वात जास्त विधानसभेच्या जागा मिळूनही आम्ही सरकार घडवू शकलो नाही. त्याची पुनरावृत्ती न करता जनतेला हवे ते सरकार देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारणार आहोत. जे आमदार का गेले याचे गुपित उघड आहे. ते परत आले तरी त्यांना आता उमेदवारी मिळेल का याविषयी मोठे प्रश्नचिन्ह आहे. युवा नेते आता उमेदवारी मागत आहेत. कॉंग्रेस हा पक्ष अफाट समुद्रासारखा असल्याने कोणी परत येऊ शकतो.

मी काँग्रेसचा मरेपर्यंत सदस्य - फालेरो
नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो म्हणाले, मी कॉंग्रेसमध्ये आज आहे, उद्याही असेन आणि कॉंग्रेसचा सदस्य मरेपर्यंत असेन. दिनेश गुंडूराव यांना आज भेटलो. त्यांना पूर्वीपासून ओळखतो. ते कालच आले. ते परिस्थिती समजून घेत आहेत. त्यांना येणाऱ्या काळात पुन्हा यावे लागेल असे दिसते. 

पक्ष सोडणाऱ्यांनी पक्षाला 
विश्वासात घ्यावे - रवी नाईक

फोंड्याचे आमदार रवी नाईक म्हणाले, आमदारांनी पक्ष का सोडला, इतर का पक्ष सोडत आहेत याचा विचार पक्षाने केला पाहिजे. राजकीय निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यावर काहीही निर्णय घेण्यापूर्वी पक्षाला विश्वासात घेतले पाहिजे, असे मला वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com