कॉंग्रेस कुडचडेत संघटन मजबूत करण्यासाठी कार्य वाढवणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

कुडचडे मतदारसंघाच्या अध्यक्षपदी पुष्कल अनय सावंत देसाई तर दक्षिण जिल्हा सरचिटणीस म्हणून अली शेख यांची काँग्रेस पक्षाने निवड केल्याबद्दल हर्षद गावस देसाई यांनी पत्रकार परिषदेत अभिनंदन केले.

कुडचडे: संघटन मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते नव्या उत्साहाने एकजूट होऊन कार्य जोमाने करणार आहेत. मतदारसंघात नक्कीच कॉंग्रेसचा दबदबा निर्माण होऊन या मतदारसंघात पक्षाचे प्राबल्य दिसून येईल, अशी माहिती कॉंग्रेस नेते हर्षद गावस देसाई यांनी दिली.

कुडचडे मतदारसंघाच्या अध्यक्षपदी पुष्कल अनय सावंत देसाई तर दक्षिण जिल्हा सरचिटणीस म्हणून अली शेख यांची काँग्रेस पक्षाने निवड केल्याबद्दल हर्षद गावस देसाई यांनी पत्रकार परिषदेत अभिनंदन केले. यावेळी काँग्रेस सदस्य पराग सबनीस, युवा अध्यक्ष वकील विराज नागेकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष इरफान किल्लेदार उपस्थित होते. 

हर्षद गावस देसाई म्हणाले, चार दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात आपण गेल्या आठवड्यात वीजमंत्र्यांना काही प्रश्न केले होते त्याची उत्तरे भलतीच व्यक्ती उत्तरे देत आहे. या व्यक्तीने आरोप प्रत्यारोप करताना आपले देवधर्म यांची जाणीव ठेऊन आरोप करावे, असे आवाहन केले. एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा बंचकेबल घोटाळा झाल्या त्याची चौकशी करण्यासाठी वीज मंत्र्यानी काय केले याचे उत्तर जनतेला देणे आवश्यक असताना वीजमंत्री भलत्याच व्यक्तीच्या तोंडून बोलत आहे, हे शोभादायक नाही, असेही हर्षद देसाई म्हणाले.

दिगंबर कामत वीजमंत्री असताना भूमिगत वीज वाहिन्यांसाठी पुढाकार घेतला होता. ती योजना मार्गी न लावता केवळ दोन वर्षांची हमी असलेली बंचकेबल योजना कोणाच्या सांगण्यावरून राज्यात सुरू करण्यात आली. आता ती निरुपयोगी होत आहे म्हणून योजना रद्ध करण्याची भाषा केली जात आहे. याचाच अर्थ जनतेचे १४५ कोटी रुपये पाण्यात गेल्यासारखे आहे. त्याची भरपाई कोण करणार या प्रश्नांची उत्तरे अद्याप देण्यात आलेली नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे वीज कर्मचारी ट्रक दुर्घटनेत बळी गेले त्यांना पन्नास लाख रुपये देण्याची संघटना मागणी करीत आहे ती रास्त आहे, असेही पत्रकार परिषदेत उपस्थितांनी सांगितले.

वीजमंत्री आपण रात्रीचे दोनपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्यास रस्त्यावर असतो. याचाच अर्थ वीज यंत्रणा निष्क्रिय झाल्यामुळे वीजमंत्री अहोरात्र जागरण करीत आहेत. यात सरकारी यंत्रणा काम करीत नसल्याचा संदेश वीजमंत्री गोव्यातील जनतेला देऊ पहात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्याचबरोबर वीज मंत्र्याकडे एकूण पाच विविध खाती आहेत. पण, कुडचडे मतदारसंघातील एकही तरुणाला त्यांनी आपला ओएसडी म्हणून घेतला नाही याचा अर्थ कुडचडेतील युवक त्या पदांना पात्र नसल्याचा आणखी एक संदेश वीजमंत्री देत आहेत, असा आरोप हर्षद गावस देसाई यांनी केला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या