
वास्को : वास्को येथील केंद्रशासित संरक्षण विभागातील गोवा शिपयार्ड कंपनीमध्ये गोवा वासियांना नोकरीत प्राधान्य न देण्यासाठी प्रशासनाबरोबरच कामगार संघटना करीत असल्याचा खळबळजनक आरोप माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केला आहे. त्याबरोबर गोवा वासियांना नोकरी न देता परप्रांतियांना नोकरीत प्राधान्य देत असल्याचा आरोप वास्को भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक नाईक यांनी केला आहे.
वास्कोतील केंद्र शासित गोवा शिपयार्ड कंपनीत अंदाजे 700 पेक्षा अधिक नोकऱ्या विविध विभागात असून त्याची जाहिरात वृत्तपत्रात नुकतीच जाहीर केली होती. मात्र या नोकऱ्या वास्को बरोबर मूरगाव तालुक्यातील शिक्षित युवकांना संधी न देता इतर राज्यातील परप्रांतियांना नोकरीत प्राधान्य देण्याचे सुरु आहे हे षडयंत्र गोवा शिपयार्डचे प्रशासन व कंपनीतील कामगार संघटना करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केला आहे. जर कंपनीचे नाव गोवा शिपयार्ड आहे तर त्यानुसार गोवा वासियांना येथे प्रथम प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.
पण गोवा शिपयार्ड राज्य सरकारला गृहीत धरून येथील युवकांना नोकरी न देता इतर राज्यातील युवकांना नोकरीची संधी देत आहे. गेली अनेक वर्षे गोवा शिपयार्ड कंपनीने गोव्यातील युवकांवर एका प्रकारे अन्याय केला आहे. जर गोवा शिपयार्ड कंपनीने गोव्यातील तसेच स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य दिले नाही तर मुख्य रस्ता अडवून कंपनी विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे नंदादीप राऊत यांनी सांगितले.
गोवा शिपयार्ड कंपनीत गोव्यातील तसेच स्थानिक युवक किती आहेत, याची माहिती हक्क कायदा अंतर्गत मागणी केली असल्याची माहिती वास्को भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक नाईक यांनी केली आहे. जर माहिती हक्क कायद्यात गोवा शिपयार्डमध्ये गोव्यातील तसेच स्थानिक युवकांना कमी नोकऱ्या आढळल्यास गोवा शिपयार्ड समोर आंदोलन करणार असल्याचे दिपक नाईक यांनी सांगितले.
माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी गोवा शिपयार्ड मध्ये नोकरी देताना सर्वप्रथम वास्को बरोबर गोवा वासियांना नोकरीत प्राथमिकता देण्याचे आदेश जारी केला होता. पण विद्यमान प्रशासन व कामगार संघटनांनी नोकर्या देताना भ्रष्टाचार माजविला असल्याचा आरोप नगरसेवक दीपक नाईक यांनी केला आहे.
गोवा शिपयार्ड कंपनी जास्त करून इतर राज्यातील युवकांना नोकरीत प्राधान्य देण्याचे षडयंत्र रचत असल्याने गोव्यातील शिक्षित युवकांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. गोवा शिपयाडेने येथील स्थानिक युवकांना नोकरी देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा गोवा शिपयार्ड समोर रस्ता रोको करून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिपक नाईक यांनी दिला.
गोवा कंपनीमध्ये गोवा वासियांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. ही मागणी गोवा शिपयाडे कंपनीचे माजी कामगार नेते किशोर शेट यांनी केली आहे. तसेच यासाठी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर,दाबोळीचे आमदार तथा पंचायत मंत्री व मूरगाव तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी.
गोवा शिपयार्ड मध्ये नोकरी संदर्भात गोवा वासियांचा प्रश्न मांडावा असे सांगताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथील स्थानिक युवकांना गोवा शिपयार्ड कंपनीत नोकरी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री बरोबर बैठक घेणे महत्वाचे आहे. कारण मुख्यमंत्री डॉक्टर सावंत हेच यावर योग्य तोडगा काढतील अशी आशा माजी कामगार नेते किशोर शेट यांनी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.