बांधकामाचा आराखडा तयार पण, फाईल सरकारी दरबारी धूळ खात

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

राज्यात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी वाढ असल्याने म्हार्दोळ, झुआरीनगर, नावेली, कोलवाळ व बांबोळी येथे नवी पोलिस ठाणी उभारण्याचा निर्णय झाला होता. या ठाण्यांना चार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती. मात्र, आजतागायत या ठाण्यांच्या बांधकामांना मुहूर्त सापडलेला नाही.

पणजी:  राज्यात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी वाढ असल्याने म्हार्दोळ, झुआरीनगर, नावेली, कोलवाळ व बांबोळी येथे नवी पोलिस ठाणी उभारण्याचा निर्णय झाला होता. या ठाण्यांना चार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती. मात्र, आजतागायत या ठाण्यांच्या बांधकामांना मुहूर्त सापडलेला नाही. या पोलिस ठाण्यांच्या बांधकामाचा आराखडा तयार आहे. पण, निधीच उपलब्ध नसल्याने फाईल सरकारी दरबारी धूळ खात पडून आहे. 

राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये असलेल्या काही पोलिस ठाण्यांचे क्षेत्र बरेच मोठे असल्याने त्या भागात आणखी एक पोलिस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव पोलिस खात्याने पाठविला होता व सरकारने गोव्यात येणाऱ्या परप्रांतीयांचा लोंढा व वाढणारी गुन्हेगारी लक्षात घेत या ठाण्यांना त्वरित मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर २०१७ मध्ये विधानसभा निवडणुका आल्याने या ठाण्यांची बांधकामे सुरू करण्यासंदर्भातची फाईल पुढे सरकली नाही. त्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारामुळे प्रशासनाच्या कामकाजात वारंवार अडचणी आल्या. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासनाची घडी बसविताना राज्यात ‘कोविड’ महामारीला सामोरे जावे लागले. त्यामुळे ह्या पोलिस ठाण्यांचे बांधकाम अजूनही सुरूच झालेले नाही. 

फोंडा तालुक्याचे क्षेत्र मोठे आहे तसेच फोंडा पोलिस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात असलेला भाग बराच मोठा आहे. त्यामुळे नियंत्रण ठेवण्यात तसेच घटनास्थळी पोहचण्यास पोलिसांना बराच वेळ लागतो. कुंभारजुवे, माशेल, बाणस्तारी, भोम, कुंडई, मडकई येथील लोकांना तक्रारी देण्यासाठी फोंडा पोलिसांत रात्री अपरात्री वाहन नसल्यास अडचणीचे होऊ लागले. त्यामुळे फोंडा ठाण्याव्यतिरिक्त म्हार्दोळ येथे नवीन पोलिस ठाणे उभारण्याचा निर्णय झाला. यासाठी सरकारने जमिनही शोधली. मात्र, त्यानंतर पुढील प्रक्रिया ठप्पच झाली आहे. त्यामुळे या भागातील लोकांना अजूनही फोंडा पोलिस ठाण्यातच तक्रार देण्यासाठी जावे लागत
 आहे. 

झुआरीनगर हा परिसर गेल्या काही वर्षात बराच गजबजलेला आहे. या ठिकाणी परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात कामानिमित्त राहत आहेत. वस्ती वाढल्याने या ठिकाणी स्वतंत्र पोलिस स्थानकाचा निर्णय घेण्यात आला. या भागात झुआरी कंपनी असल्याने लोकांची वस्ती वाढली आहे. वेर्णा व वास्को पोलिस ठाण्याच्या ‘मधोमध’ या भाग येत असल्याने या दोन्ही पोलिस ठाण्यांना झुआरीनगर या भागात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आवाक्याबाहेर जात होते. पोलिस ठाणे झाले नाही. या भागात कामानिमित्त येणाऱ्या परप्रांतीय मजुरांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढू लागली आहे व ते झोपड्यांमधून राहत आहे. या झोपडपट्ट्या गुन्हेगारांचे आश्रयस्थानही बनले आहे. त्यामुळे या भागातच स्वतंत्र पोलिस स्थानकाची गरज असल्याचा मुद्दा समोर आला होता. 

बांबोळी हा परिसर पणजी पोलिस ठाण्याला जवळ असूनही तो आगशी पोलिस ठाण्याच्या अधिकारकक्षात येतो. या ठाण्यातून पोलिस बांबोळी येथे पोहचण्यापूर्वी पणजीचे पोलिस लवकर पोहचू शकतात. गेल्या काही वर्षात बांबोळी परिसरात नव्याने बांधकामे उभी राहिली आहेत तसेच गोमेकॉ व दंत इस्पितळ, पंचतारांकित हॉटेल्स तसेच राष्ट्रीय महामार्ग यामुळे बांबोळी हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. गेल्या काही वर्षात या ठिकाणी वस्तीही वाढली आहे. लष्करची प्रशिक्षण केंद्रेही येथे आहेत. सध्या गोमेकॉ इस्पितळाच्या आवारात बांबोळी पोलिस चौकी आहे त्याचे रुपांतर पोलिस ठाण्यात करण्याचा निर्णय झाला होता. 

कोलवाळ या भागात मोठ्या प्रमाणात भंगारअड्डे तसेच औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे मजूर लोकांची संख्याही वाढली आहे. हा भाग गुन्हेगारांचे छुपण्याचे ठिकाण बनले आहे. सुमारे ३० हून अधिक भंगारअड्डे असल्याने या ठिकाणी चोरीचे सामान विकण्याचे प्रकारही घडतात. कोलवाळ हा भाग सता असंवेदनशील असल्याने वेगळ्या पोलिस ठाण्याची मागणी लोकांकडून झाली होती. नावेली येथे नव्या पोलिस ठाण्याची मागणी तेथील लोकांनी केली होती. तेथील भौगोलिक क्षेत्र तपासून नावेली येथे स्वतंत्र पोलिस ठाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पाचही पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्याचे बांधकाम सुरू होऊन ते पूर्ण होईपर्यंत लोकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या