समाज घडविण्यास शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे

वार्ताहर
रविवार, 6 सप्टेंबर 2020

डॉ. मेहंदिरत्ता : सडा येथील दीपविहार विद्यालयात शिक्षकदिन

कुठ्ठाळी: समाजाच्या जडण-घडणीत अप्रत्यक्षपणे शिक्षकांचेही कार्य असते. मुलांना योग्य मार्गदर्शन दाखवून आदर्श नागरिक घडविण्यात शिक्षकांचा वाटा अधिक आहे आणि त्यावरच समाजाची घडण होते. त्यामुळे समाज घडविण्यात शिक्षकांचे विद्यादानातून योगदान महत्त्वाचे आहे. शिक्षकांचे स्थान अनन्य साधारण असून, त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, असे उद्‍गार एसएमआरसी इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल मेहंदिरत्ता यांनी काढले.

वास्को-सडा येथील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या शिक्षकदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य सौ. मृणाल कोरगावकर, शाळेचे व्यवस्थापक संजय बाणावलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संयोजक तथा अधिकारी प्रा. सुनील शेट, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. श्रीकांत पालसरकर, प्रा. मनिषा नाईक उपस्थित होते.

एखाद्यावेळी प्रथमोपचाराची गरज असलेल्या रुग्णाला योग्य वेळी प्राथमिक उपचार मिळाले तर त्या व्यक्तीचा प्राण वाचला जाऊ शकतो. परंतु प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीने वस्तुस्थितीचे भान ठेवून उपचार प्रक्रिया हाताळली पाहिजे. या कार्याप्रमाणेच शाळेतील शिक्षकांना प्रथमोपचाराचे प्राथमिक ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असल्याचे आहे, असेही डॉ. मेहंदिरत्ता म्हणाले.

व्यवस्थापक संजय बाणावलीकर यांनी शिक्षकांच्या कार्याची माहिती देऊन शिक्षकांचे कार्य समाजासाठी फार मोलाचे असल्याचे सांगितले. 

प्राचार्य मृणाल कोरगावकर यांनी सर्व शिक्षकांच्या प्रति आदरभाव व्यक्त करून स्वतःच्या शिक्षकाबद्दल प्रेमळ स्मृतींना उजाळा दिला.

प्रा. सुनील शेट यांनी स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी प्रा. श्रीकांत पालसरकर व प्रा. जगन्नाथ कुंडईकर यांनी आपल्या अनुभव कथनातून आठवणींना उजाळा दिला.

यावेळी संजय बाणावलीकर यांच्या हस्ते सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर वर्गाचा पुष्प देऊन सन्मान केला. अकरावीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी शिक्षकासांठी आनलाईन कार्यक्रम सादर केला. प्रा. मारीया डायस यांनी डॉ. अनिल मेहंदिरत्ता यांची ओळख केली.

प्रा. मनीषा नाईक यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. श्रीकांत पालसरकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या