गोवा: ‘ते’ वादग्रस्त ट्विट कर्मचाऱ्यास भोवले

दैनिक गोमंतक
सोमवार, 5 एप्रिल 2021

पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल एका कर्मचाऱ्याला गोवा पर्यटन विकास महामंडळातील कंत्राटी नोकरी गमवावी लागली आहे.

पणजी: पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल एका कर्मचाऱ्याला गोवा पर्यटन विकास महामंडळातील कंत्राटी नोकरी गमवावी लागली आहे. महामंडळाचे समाज माध्यम हाताळण्यासाठी प्रकल्प विभागातून या कर्मचाऱ्याची सेवा घेण्यात आली होती. (Controversial tweet about Shivaji Maharaj forced the employee to resign)

बेरोजगारीच्या अहवालावर सीएमआयई संस्थेला द्यावं लागणार गोवा राज्यसरकारला...

आग्वाद किल्‍ल्याने पोर्तुगीज शासकांचे मराठा व डच आक्रमणकर्त्यांकडून संरक्षण केल्याचे या ट्विटमध्ये नमूद करताच शिव छत्रपती प्रेमींनी सरकारचा निषेध करत जाहीर माफी मागण्याची सरबत्ती सुरु केली होती. अखेर या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. उपसरव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) एस. के. नार्वेकर यांनी या प्रकरणी चौकशी करून त्या संबंधित कर्मचाऱ्यावर जबाबादारी निश्चित केली. त्यानुसार त्याची सेवा खंडित करण्यात आली आणि सेवेतून त्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले.

माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल महामंडळाला २०१७ मध्ये राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार मिळाला होता. मात्र असे असले तरी त्या कर्मचाऱ्याने ट्विट केले, तो मजकूर कोणी तयार केला होता? तो जाहिरातबाजीच्या प्रकल्पाचा भाग आहे का? याची उत्तरे महामंडळाने दिलेली नाहीत. यापुढे ट्विट केला जाणारा मजकूर महामंडळाचा जबाबदार अधिकाऱ्याच्या मान्यतेनंतरच जारी केला जाईल, असे महामंडळाने माध्यमांना दिलेल्या माहिती मध्ये स्पष्ट केले आहे. 

संबंधित बातम्या