खाजन जमिनीचे शेतीत रूपांतर करा

राज्यातील २५ टक्के खाजन जमिनीचे शेतीत रूपांतर केल्यास कृषी उत्पादन वाढू शकते व त्यामुळे राज्याच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, असा विश्वास नुकत्याच झालेल्या एका वेब सेमिनारमध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केला.
Khajan
KhajanDainik Gomantak

पणजी

‘आयडियाज फॉर गोवा’ या संस्थेतर्फे नुकतीच एक वेबिनार (वेब सेमिनार) सामाजिक माध्यमांच्या आधारे ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ पद्धतीने दाखविण्यात आला. यामध्ये संस्थेचे प्रमुख तथा समन्वयक राहुल बसू यांनी सूत्रधाराची भूमिका निभावली.

व्यासपीठावर गोवा फाउंडेशन संस्थेचे प्रमुख क्लॉड अल्वारीस, एडिबल अर्काईव्हसच्या शालिनी कृष्णन, गद्रे मरिन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन गद्रे आणि झांट्ये कॅश्युज्‌ या काजू उत्पादक व विक्री कंपनीचे व्यस्थापकीय संचालक रोहीत झांट्ये उपस्थित होते.

या चर्चासत्रात्मक परिषदेचे ‘आयडियास फॉर गोवा’ या संस्थेच्या वेबसाईटवर आणि युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी बोलताना गद्रे मरीन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन गद्रे म्हणाले, की सरकारने राज्यातील २५ टक्के खाजन जमिनीचे शेतीत रूपांतर करण्याविषयी नक्कीच विचार करावा.

राज्यात एकूण १८,५०० हेक्टर जमीन खाजन शेतीमध्ये अथवा लागवडीमध्ये येते, जी नैसर्गिक प्रणाली नसून मानवनिर्मित व्यवस्था आहे. या भागात शेती केल्यास मिळणारे उत्पन्न ३५० रुपये प्रती किलो जरी पकडले, तरी उत्पन्नामध्ये वाढ होऊन १२०० ते २७०० कोटी रुपये एवढे उत्पन्न मिळू शकते. या वाढलेल्या महसुलामुळे व उत्पन्नामुळे अनेक गोमंतकीयांचे दारिद्र्य दूर व्हायलाही मदत होऊ शकते.

गोवा फाउंडेशनचे क्लाड अल्वारीस म्हणाले, की काजू हे एक सेंद्रिय पद्धतीचे पीक आहे. इतर पिकांसाठी आम्ही केमिकल वा रासायनिक द्रव्ये वापरू शकतो, पण कीटकनाशक वापरू नये. त्यामुळे अशाप्रकारचे सेंद्रिय वा ऑरगॅनिक पीक विकसित करून ‘गोवा ऑरगॅनिक’ नावाचा ब्रँडही भविष्यात विकसित करता येऊ शकतो.

रोहीत झांट्ये म्हणाले, की काजूचे उत्पन्न फारच कमी म्हणजेच ५०० किलो प्रती हेक्टर एवढे असते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून काजूच्या पिकाकडे दुर्लक्ष केले जाण्याची शक्यता जास्त असते. काजूबरोबरच चंदन आणि काळी मिरी यांचीही लागवड करण्यास शेतकऱ्यांना अधूनमधून प्रोत्साहन दिल्यास त्यापासून मिळणारे उत्पन्न १ हजार ते १५०० किलो प्रती हेक्टर एवढे वाढू शकते.

शालिनी कृष्णन म्हणाल्या, की केवळ जमीन उपलब्ध असणे पुरेसे नाही. ती कशी प्रभावीपणे वापरायची याचे ज्ञान शेतकरी समुदायाला दिले गेले, तर हा उपक्रम जास्त प्रभावशाली आणि उपयोगी ठरू शकतो.

राहुल बासू यांनी प्रेक्षकांना चाकोरी बाहेर जाऊन विचार करून गोमंतकीय शेती व्यवसाय व पारंपरिक व्यवसायांना पुनरुज्जीवन कसे मिळेल, याविषयी सूचना कळविण्याची विनंती केली. अशा लोकांना काही नव्या सूचना वा संकल्पना सूचविण्याची इच्छा असेल, त्यांनी ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू. आयडियास फॉर गोवा. कॉम’ या संकेतस्थळावर जाऊन त्या सूचना लिहिण्याची विनंती राहुल बासू यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com