आरोग्य केंद्राला सहकार्य करा : उपजिल्हाधिकारी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

‘कोरोना’ संक्रमण काळात सांगे आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, कर्मचारी आणी खास करून आरोग्य निरीक्षकांनी चांगले कार्य केले आहे. आजही तितक्याच गतीने कार्य करीत आहेत. राज्यातील तुलनेत मोठ्या संक्रमणापासून सांगे तालुका बचावला आहे.

सांगे :‘कोरोना’ संक्रमण काळात सांगे आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, कर्मचारी आणी खास करून आरोग्य निरीक्षकांनी चांगले कार्य केले आहे. आजही तितक्याच गतीने कार्य करीत आहेत. राज्यातील तुलनेत मोठ्या संक्रमणापासून सांगे तालुका बचावला आहे. या पुढेही अशीच काळजी घ्यावी व नागरिकांनी आजार दडवून न ठेवता आपल्या व आपल्या कुटुंबातील इतरांना त्याचा त्रास होऊ नये, यासाठी सांगे आरोग्य केंद्राला सहकार्य करावे, असे आवाहन सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी सांगे येथे केले. 

सांगे आरोग्य केंद्रात सुरू केलेल्या पोस्ट कोविड केंद्राच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त मामलेदार अनारिता पायस, सांगेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सीमा पै फोंडेकर, डॉ, शिल्पा कायसुवकर, माळकर्णेचे पंचायत सदस्य संदेश गावकर, सांगेचे आरोग्य निरीक्षक वासुदेव नाईक उपस्थित होते. 

आरोग्य अधिकारी डॉ. सीमा पै फोंडेकर म्हणाल्या, या केंद्रात ज्यांना कोविड होऊन महिना उलटला त्यांना पुढील खबरदारी व उपाय योजना तसेंच प्लाझ्मा संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. दर गुरुवारी संध्याकाळी ही सेवा उपलब्ध असणार आहे. डॉ. शिल्पा कायसुवकर या येणाऱ्या रुग्णाची तपासणी करून पुढील औषोधोपचार करणार असल्याची माहिती यावेळी दिली. 

डॉ. शिल्पा कायसुवकर म्हणाल्या, कोविड होऊन गेलेल्यांना महिन्यानंतर आपोआप कमजोरपणा जाणवतो. पण, या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता उपचारासाठी सांगे आरोग्य केंद्रात भेट देण्याचे आवाहन केले. आरोग्य निरीक्षक वासुदेव नाईक यांनी स्वागत केले.

संबंधित बातम्या