‘त्या’ विधानाबाबत सहकारमंत्र्यांकडून दिलगिरी 

dainik gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

सरकारमध्ये असलेल्या मंत्र्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभविरुद्ध जी वक्तव्ये केली ती पत्रकारांचे खच्चीकरण करणारी आहेत. ज्यांनी ‘पेड न्यूज’ केली आहेत त्यांची नावे जाहीर करावी व त्याचा पुरावा द्यावा असे संघटनेने त्यांना सांगितले.

पणजी

व्हीपीके अर्बन सहकारी पतसंस्थेसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्टीकरण करताना पत्रकारांना ‘पत्रेकार’ असे संबोधल्याने व‘पेड न्यूज’चा आरोप केल्याप्रकरणी गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने (गुज) त्यांची भेट घेऊन जाब विचारला. अनावधनाने पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भावना दुखावल्या असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो तसेच पत्रकारांवर आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता असे मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले. 
गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांच्यासह काही पत्रकारांनी आज सहकामंत्री गोविंद गावडे यांची भेट घेतली व त्यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकारमध्ये असलेल्या मंत्र्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभविरुद्ध जी वक्तव्ये केली ती पत्रकारांचे खच्चीकरण करणारी आहेत. ज्यांनी ‘पेड न्यूज’ केली आहेत त्यांची नावे जाहीर करावी व त्याचा पुरावा 
द्यावा असे संघटनेने त्यांना सांगितले. या विधानामुळे समाजात सर्वच पत्रकार हे पेड न्यूज करतात असा संदेश गेला आहे व प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे मंत्री गावडे यांनी ज्या पत्रकारांवर त्यांचा रोष होता त्याच्याबाबतचा पुरावा सिद्ध करावा. एखाद्या आमदार व मंत्र्याने पत्रक काढल्यास ते छापणे चुकीचे आहे का? हे पत्रक इतर अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे त्यामुळे जर या बातमीला त्यांचा आक्षेप होता तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा पत्रक प्रसिद्ध करण्याची गरज होती. मात्र पत्रकारांवर असे आरोप करणे उचित नव्हते. यापूर्वीही राजकारण्यांनी एकमेकाविरुद्ध आरोप - प्रत्यारोप केले आहे मात्र पत्रकारांना वेठीस किंवा असे प्रकार घडले नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. 
यासंदर्भात स्पष्टीकरण देत मंत्री गावडे म्हणाले, बातमीमध्ये सहकारमंत्र्यांचा उल्लेख झाल्याने त्यावर प्रतिक्रिया व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. हे स्पष्टीकरण करताना पत्रकारांच्या कार्यपद्धतीसंदर्भात जे मुद्दे मांडले त्यातून प्रतिमा मलिन करण्याचा कोणताच हेतू नव्हता. या स्पष्टीकरणावेळी बोलताना काही चुका झाल्याही असतील व त्यातून पत्रकारांच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले. 

संबंधित बातम्या