कोरोनाची झळ अधिवेशनालाही

Dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

दोन आठवड्यांचे नियोजित अधिवेशन आता होणार एक दिवशीय

पणजी

कोरोनाला घाबरू नका, असे सांगणाऱ्या सरकारवर आता विधानसभेचे पूर्वी दोन आठवड्यांचे ठरवलेले अधिवेशन एकाच दिवसाचेच घेण्याची वेळ आली आहे. आज सर्वपक्षीय बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्प मंजूर करण्याचे मुख्य कामकाज होते. त्यामुळे एका ओळीचा ठराव मांडून सरकार अर्थसंकल्प मंजूर करणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थात याविषयीचा ठराव कामकाज सल्लागार समितीच्या होणाऱ्या बैठकीत मंजूर करावा लागणार आहे.
राज्य सरकारने २७ जुलै रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. त्याआधी विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी विधानसभा अधिवेशनात कामकाजाचे दहा दिवस असतील, असे नमूद केले होते. त्यानंतर सत्ताधारी आमदार आणि त्याच्या कुटुंबियांना ‘कोविड’चा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारने विधानसभा अधिवेशनाचा कालावधी केवळ एका दिवसाचा करण्याचे ठरवले आहे. या सरकारच्या निर्णयामुळे जनतेमध्ये असलेल्या घबराटीत आणखी वाढ झाली आहे. विधानसभा अधिवेशन होऊ शकत नाही, एवढा कोरोनाने आपला प्रभाव राज्यात दाखवला आहे, अशा आशयाचे व्हॉट्‍सॲप स्टेटस पहावयास मिळू लागले आहेत.

लेखानुदानापुरते अधिवेशन घ्‍यावे : दिगंबर कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, आजची बैठक ही अनौपचारीक बैठक होती. अनेक विषयांवर चर्चा झाली. कोरोनाची आजची स्थिती आणि २७ जुलै रोजी काय स्थिती असू शकते याचा विचार करून विधानसभा अधिवेशन एक दिवसाचे घ्यावे, असा एक प्रस्ताव आहे. आम्ही सांगितले की, एक दिवसाचे अधिवेशन घेणार असाल तर ते केवळ लेखानुदानापुरते घेण्यात यावे. अर्थसंकल्प मंजूर करू नये. अर्थसंकल्प पूर्ण बदलावा लागणार आहे, सादर केलेल्या अर्थसंकल्पाला अर्थ राहिलेला नाही. यावर विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्याचे ठरले. इतर राज्ये काय करत आहेत हेही पाहिले जाणार आहे.
 

मर्यादित प्रमाणात का होईना पर्यटन सुरू व्‍हावे : मुख्‍यमंत्री
 एकीकडे विधानसभा अधिवेशनाचा कालावधी कमी केला जातो आणि दुसरीकडे पर्यटकांना येण्यास परवानगी दिली जाते, हा विरोधाभास नाही का? असे विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले,  पर्यटन ही अर्थव्यवस्थेला गती देणारे असे क्षेत्र आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यामुळे विदेशातून पर्यटक येत नाहीत. आताही आंतरराज्य प्रवास करता येतो. ‘कोविड’ची लागण नाही असे प्रमाणपत्र घेऊन कोणीही राज्यात येऊ शकतो. तसे येणाऱ्यांना राहण्याची, जेवणाची सोय करण्यासाठी हॉटेल्स खुली झाली पाहिजेत. मर्यादित स्वरुपात का होईना पर्यटन सुरू झाले पाहिजे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले. 

ते पुढे म्‍हणाले, सर्व काळजी घेऊन हे सारे केले जात आहे. देशांतर्गत पर्यटक येतील. रोजगार हवा आहे, त्यासाठी पर्यटन क्षेत्र खुले करण्यात येत आहे.  तर बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय सपशेल चुकीचा आहे, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले, हॉटेलवाले ‘कोविड’ केंद्रे करण्यास तयार नव्हते. आता गोव्यात लोक येतील आम्ही सर्व त्रासात पडू. मी विरोध नोंदवला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, सर्वपक्षीय बैठक विधानसभेच्या सभापतींनी बोलावली होती. सध्याचे वातावरण पाहता सर्वांची मते त्यांना जाणून घ्यायची होती. सर्वानुमते एक दिवसाचेच विधानसभा अधिवेशन घेण्याचे ठरले आहे. त्यावर एकमत झाले आहे. त्यादिवशी नेमके कामकाज काय असेल, याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाईल. मुख्यमंत्र्याना अधिवेशनात लेखानुदान मंजूर करणार की अर्थसंकल्प असे पुन्हा विचारल्यावर ते म्हणाले, त्यादिवशी लेखानुदान मंजूर केले जाणार की अर्थसंकल्प हे सारे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरेल. आजच्या बैठकीत विधानसभा अधिवेशनाच्या दिवशीचे कामकाज हे विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरवावे, असे ठरले आहे.

जगलो तर कितीतरी  अधिवेशने घेता येतील : चर्चिल
बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले, मानवी जीवन अति महत्त्वाचे आहे. जगलो तर कितीतरी अधिवेशने घेता येतील. पुढे दोन महिन्यांसाठीही अधिवेशन घेता येईल. सध्या वाईट वातावरण आहे. महामारीने जगात थैमान घातले आहे. त्यापासून आम्ही धडा घेतला पाहिजे. पावसाळी हवामानामुळे आता रुग्णसंख्या वाढणार आहे. विधानसभा कामकाजावेळी कर्मचारी व पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने एकाच दिवसाचे अधिवेशन पुरे.

आभासी विधानसभा घ्‍यावी : ढवळीकर
मगोचे आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले, आभासी विधानसभा (व्हर्च्युअल) घ्यावी ही मागणी योग्य आहे. सरकारी विधेयके, प्रश्नोतर तास याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

कोविडबाबत सरकारचा संभ्रम कायम : सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले, सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरल्यानेच रुग्णसंख्या वाढत आहे. सत्ताधारी आमदार इस्पितळात पोहोचला आहे. विधिमंडळ सचिव बैठक घेऊ नका असे सांगतात. अर्थसंकल्प समितीची बैठक मी बोलावली होती, कारण अर्थसंकल्पाची फेररचना करावी लागणार आहे. वित्त खात्याला फेररचना करायला नको. सरकार स्वतःला वाचवण्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन घेत आहे. कोरोना व कोविडमधील फरक कळण्यास सरकारला सहा महिने लागले. आताही सामाजिक संक्रमण आहे की नाही याबाबत गोंधळ आहे. 
 

संबंधित बातम्या