कोरोनाचा मद्यविक्रीवरही परिणाम ७५ टक्क्यांने मागणी घटली : विक्रेते हवालदिल

Dainik Gomantak
मंगळवार, 23 जून 2020

मद्यविक्री बंद पडल्यामुळे वा बऱ्याच प्रमाणात खाली आल्यामुळे सरकारला मिळणारा महसूलही कमी झाला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात मद्य व्यवसायातून सरकारला ४८७.७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. पण यावर्षी मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसूल मध्येही बऱ्याच प्रमाणात घट होणार हे स्पष्ट आहे.

पणजी,

टाळेबंदीमुळे बंद पडलेल्या पर्यटन उद्योगामुळे राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असून मद्यविक्री व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. टाळेबंदीमुळे पर्यटन व्यवसाय घसरल्याने मद्यविक्री ७५ टक्केखाली आली आहे. त्यामुळे बार, रेस्टॉरंट व हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
कोरोनाचा कहर आणि टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीची तीव्रता आता हळूहळू जाणवू लागली आहे. टाळेबंदीमुळे राज्यातील जवळपास सर्व उद्योग व्यवसायावर झालेला विपरीत परिणाम आणि पुन्हा उभे राहण्यासाठी धडपडणारे राज्यातील उद्योग व्यवसाय यांचा संबंध आता दिसून येत आहे. टाळेबंदीमुळे सर्व सामाजिक कार्यक्रम, मेळावे, भेटीगाठी, चर्चात्मक कार्यक्रम व इतर घडामोडी बंद झाल्या. लग्न समारंभ, सामाजिक मेळावे, लोकांचे हॉटेल, बार व रेस्टॉरंटमध्ये जाणे अगदीच कमी व जवळपास बंद झाले. याचा परिणाम म्हणून मद्यविक्री व्यावसायिक, बार व रेस्टॉरंट आणि हॉटेलमालक यांना मद्यपुरवठा बंद करणे भाग पडले तसेच मद्यविक्रीची दुकाने कुलूपबंद ठेवणे भाग पडले आहे. यामुळे मद्यव्यवसायावर बऱ्याच प्रमाणात नकारात्मक परिणाम झाला आहे.
मद्यविक्री बंद पडल्यामुळे वा बऱ्याच प्रमाणात खाली आल्यामुळे सरकारला मिळणारा महसूलही कमी झाला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात मद्य व्यवसायातून सरकारला ४८७.७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. पण यावर्षी मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसूल मध्येही बऱ्याच प्रमाणात घट होणार हे स्पष्ट आहे. एप्रिल महिन्यापासून अनेक मद्यव्यावसायिकांकडे मद्याचा साठा गोदामामध्ये पडून आहे.
अखिल गोवा मद्यविक्रेता संघटनेने (ऑल गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशन - एजीएटीए ) दारू तयार करणाऱ्या संस्थांना पत्र लिहिताना विक्रीमध्ये १० टक्के सूट द्यावी तसेच १० टक्के किमतीचा भाग कमी करावा, अशा मागण्या केलेल्या आहेत.
दारूच्या व्यवसायात झालेली घट हा प्रामुख्याने खालावलेल्या पर्यटकांच्या संख्येने निर्माण झालेल्या स्थितीचा परिणाम आहे. याचा बराच फटका प्रामुख्याने किनारी भागातील मद्य व्यावसायिकांना बसला आहे. या दुकानांसाठी व्यावसायिकांना ३० हजार रुपयापासून १ लाख रुपयापर्यंतचे भाडे द्यावे लागते. पण सध्या मद्याची मागणी प्रचंड कमी झालेली असल्याने मद्यव्यावसायिकांना दुकानाच्या भाड्याचे पैसे भरणेही मुश्कील झाले आहे. याविषयी बोलताना मद्यव्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात की मद्यविक्रीला ७५ टक्के नुकसान सोसावे लागले असून कुठल्याही मद्यविक्री दुकानाने २० ते २५ टक्क्यांपेक्षा जास्त धंदा केलेला नाही. अनेक मद्यविक्रेत्यांच्या राज्यात पणजी आणि कळंगुटसारख्या ठिकाणी व पर्यटकांचे 'हॉटस्पॉट' मानल्या जाणाऱ्या ठिकाणी मद्यविक्रीची दुकाने आहेत. पण मद्यविक्री थंडावल्याने बऱ्याच विक्रेत्यांना आपल्या महिन्याच्या खर्चाएवढे पैसे मिळविणेही कठीण बनले आहे. काही विक्रेत्यांनी आपली इतर दुकाने न उघडता ती बंदच ठेवणे पसंत केले आहे. पर्यटकांना नजरेसमोर ठेवून काही मद्यविक्रेते काजूबियाही मोठ्या प्रमाणात विकत असतात. पण पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावल्याने सध्या काजूबियांच्या विक्रीवरही विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
 

संबंधित बातम्या