कोरोनाने मोडला ‘हॉस्पिटॅलिटी’चा कणा

dainik Gomantak
मंगळवार, 12 मे 2020

कोरोना महामारीमुळे टाळेबंदीचा फटका सर्वच व्यवसायांना बसलेला आहे. पर्यटन व्यवसायाबरोबरच हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) क्षेत्राला महामारीचा सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पणजी

कोरोना महामारीमुळे टाळेबंदीचा फटका सर्वच व्यवसायांना बसलेला आहे. पर्यटन व्यवसायाबरोबरच हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) क्षेत्राला महामारीचा सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरवातीला टाळेबंदीमुळे या क्षेत्राचे १ हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची तसेच ६० हजार ते ७० हजार नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात होती, पण टाळेबंदी आणि महामारीचा एकूण प्रचंड परिणाम पाहता या व्यवसायांवर अजून मोठ्या प्रमाणात संकट येण्याची भीती या क्षेत्रात वावरणारे व्यक्त करीत आहेत.
कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे संकटग्रस्ततेच्या छायेत वावरणाऱ्या हॉस्पिटॅलिटी उद्योगातील हॉटेलियर आणि व्यावसायिकांसमोर निराशा आणि वैफल्यग्रस्ततेचे सावट आहे. अनिश्चिततेचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता असून यातून सावरणार कसे? हा मोठा प्रश्‍न सध्या या व्यावसायिकांना भेडसावत आहे. कोविड १९ मुळे या व्यवसायाचे १ हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता असून जवळपास ६० ते ७० हजार लोकांना आपले रोजगार टिकविण्याची चिंता भेडसावत आहे. महामारीचे परिणाम एवढे गंभीर आणि एवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत होतील, असे बहुतेक व्यावसायिकांना वाटले नव्हते. निदान या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात तरी स्थिती पूर्वपदावर यावी, अशी अपेक्षा व्यावसायिक बाळगून आहेत, पण काहीजण ती शक्यताही कमी असल्याचे मत व्यक्त करीत आहेत. राज्य सरकारकडून काहीतरी सहानुभूती मिळेल, अशी आशा सध्या या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत. सरकार निदान परवाना शुल्क व वीज बिलावरील रकमेवर तरी सूट देईल, अशी आशा सध्या आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत, पण सध्या कमी महसूल आणि करवसुलीमुळे आधीच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले राज्य सरकार या क्षेत्रातील हवालदिल झालेल्या व्यावसायिकांना कुठून आर्थिक मदत करेल, हा मोठा प्रश्‍न आहे.

सरकारकडून आर्थिक मदतीची गरज
एका व्यावसायिकाच्या म्हणण्याप्रमाणे, कोविड १९ महामारीमुळे ट्रॅव्हल इंडस्ट्रीवर झालेला परिणाम उद्योगाला उद्‍ध्वस्त करणारा ठरला आहे. सर्व स्थिती पूर्वपदावर येईपर्यंत जे आर्थिक नुकसान होणार आहे, ते सोसण्यासाठी या क्षेत्राला सरकारकडून आर्थिक मदत लागणारच असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. काही व्यावसायिकांनी उद्योग चालविण्याचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी वर्गाला कामावरून कमी केले आहे, पण असेही व्यावसायिक आहेत, ज्यांना या उद्योगात येऊन केवळ २ ते ३ वर्षेच झालेली आहेत. त्यांना या व्यवसायात सहा ते सात महिने काहीही धंदा, कमाई अथवा आर्थिक उलाढाल न करता तग धरून राहणे जवळपास अशक्य होणार आहे. काही हॉटेल व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसानीत आहेत, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. समुद्रकिनाऱ्यांवर शॅक चालविणाऱ्या व्यावसायिकांना तरी सरकारकडून काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा वाटत होती, पण सरकार अजूनतरी या विषयावर गप्प असल्याने या व्यावसायिकांनाही समाधानकारक असे कुठलेही आश्‍वासन किंवा मदत मिळण्याची शक्यता अजून तरी धूसर आहे.

संबंधित बातम्या