गणेशोत्सवासाठी कारवारला जाणाऱ्यांची कोरोना महामारीमुळे गैरसोय

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

नियमांमुळे जाण्या-येण्यात अडचणी, गोव्यातच गणेशपूजनाची निर्णय

काणकोण: गोव्यातून पोळेमार्गे कर्नाटकाच्या वेगवेगळ्या भागात गणेश पूजनासाठी जाणाऱ्या गोव्यातील चाकरमान्यांची यंदा कोरोना महामारीमुळे गैरसोय होणार आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रात काम करणारे पाच ‌‌हजारांहून जास्त चाकरमानी गोव्यात वास्तव्य करून आहेत. पोळे सीमा ओलांडण्यासाठी राज्य सरकारची कोणतीच अट नाही, मात्र चतुर्थीचा सण संपल्यावर पुन्हा राज्यात आल्यानंतर प्रमाणित नियमावली नुसार त्यांना चौदा दिवस होम क्वॉरंटाईनमध्ये राहावे लागणार आहे, असे काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी सांगितले.

गणेश चतुर्थी काळात  कर्नाटक सरकारची एसओपी व राज्यात परत आल्यानंतर राज्य सरकारची एसओपीचा ससेमिरा चुकवण्यासाठी काही लोकांनी गोव्यातच गणेश पूजन करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी गणेश चित्र शाळेतून मूर्तीची आगाऊ नोंदणी केली आहे. एका अंदाजानुसार गणेश चतुर्थी काळात सुमारे पाच हजार कुटुंबे गोव्यातून कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागात जाऊन गणेश विसर्जनानंतर पुन्हा गोव्यात येत असतात. या दिवसांत गोव्यातून कारवारला जाणाऱ्या प्रवासी बसगाड्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात, त्याशिवाय कदंब महामंडळ या काळात जादा गाड्या सोडत होते.

बाजारावर परिणाम
कारवार व काणकोण याचे पूर्वापार रोटी व बेटीचे संबंध राहिले आहेत. सणासुदीला भाजीपासून कपड्यापर्यंत काणकोणवासीय कारवार बाजारावर अवलंबून होते. काणकोणमधील जाई पुष्पाच्या गजऱ्यांची सर्वाधिक विक्री कारवारमध्ये होत होती. मात्र कोरोना महामारीमुळे जाईफुलांच्या गजऱ्यांना मागणी कमी झाली आहे. नारळ, सुपारी व अन्य बागायत उत्पादनांना हक्काची कारवार बाजारपेठ होती. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती सदाशिवगड येथून आणल्या जात होत्या. मात्र महामारीमुळे या सर्व व्यवहारांवर रोख लागला आहे. चतुर्थीनंतर हणकोण-कारवार येथील श्री सातेरी देवीच्या नव्याच्या उत्सवानिमित्त वर्षातून  एकदाच मंदिर उघडण्यात येते. या काळात देवीच्या दर्शनाला राज्यातून शेकडो भाविक जात होते, मात्र यंदा त्यामध्ये खंड पडणार आहे.

...नजर चुकवून!
गोव्याहून पोळे तपासणी नाक्यावरून कर्नाटकाच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी प्रवेश खुला आहे. मात्र कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्यांना एसओपी नियमावली पाळावी लागते. मात्र पोळे तपासणी नाक्याचा ससेमिरा चुकवण्यासाठी पोळे येथील लोलये येथील कोकण रेल्वेचा बोगदा, मार्ली-आंबाड्याफोंड व अन्य आडवाटांवरून रहिवाशांची काणकोणात ये-जा चालू असते. या आडवाटांवर पोलिस गस्त असली तरी पोलिसांची नजर चुकवून नागरिक सीमापार जातात.

संबंधित बातम्या