कोरोना महामारी म्हणजे सहनशीलतेची परीक्षा!

वार्ताहर
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

सद्‌गुरू भाऊ महाराज, बेतोडा पारवडेश्‍वर मठातर्फे आशीर्वचन

पाळी:  कोरोनाची महामारी म्हणजे माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा असून शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य जर आपण राखू शकलो तर कोरोनावर मात करणे सहज शक्‍य आहे. माणूस आज विविध कारणांमुळे नैराश्‍यात जात आहे. प्रयत्न करणे हे आपल्या हाती असते. प्रयत्न करणाऱ्याला नेहमीच परमेश्‍वररूपी आशीर्वाद प्राप्त होत असतो, म्हणून प्रत्येकाने संकटाला सामोरे जाताना धैर्य तर बाळगावेच, पण संकटाला परतवून लावण्यासाठी मानसिक बळही ठेवावे, असे आवाहन बेतोडा येथील पारवडेश्‍वर मठाचे अधीपती सद्‌गुरु भाऊ महाराज यांनी केले. 

बेतोडा - फोंड्यात सद्‌गुरु पारवडेश्‍वर मठातर्फे श्रावणमासात तसेच चतुर्थीच्या काळात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध उपक्रमांवेळी सामाजिक अंतर राखून तसेच अन्य काळजी घेऊनच हे उत्सव साजरे करण्यात आले. या उत्सवांवेळी भाविकांना मार्गदर्शन करताना सद्‌गुरु भाऊ महाराज यांनी मानसिक स्वास्थ्यासाठी परमेश्‍वराचे नामस्मरण आणि सद्‌गुरुचे स्मरण हे प्रामुख्याने आवश्‍यक असल्याचे नमूद केले. सद्‌गुरु पारवडेश्‍वर महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी केलेले मार्गदर्शन आणि दिलेले योगदान हे प्रत्येकाचे मानसिक बळ उंचावणारे ठरले आहे. मानसिक बळ असेल तर शारीरिक बळ सहज प्राप्त होते. त्यामुळे दोन्हींची सांगड घालताना सद्‌गुरुचे आशीर्वाद आणि परमेश्‍वराची कृपा मिळवणेही तेवढेच गरजेचे आहे. 

सद्‌गुरु पारवडेश्‍वर महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी प्रचार आणि प्रसार करताना अनेक कुुटुंबांना दिलासा दिला. त्यामुळेच तर आज कौटुंबिक आणि सामाजिक सलोखा राखणे शक्‍य झाले आहे. सद्‌गुरु पारवडेश्‍वर महाराजांचे हे कार्य अलौकीक असून या कार्याचा आदर्श आज युवा पिढीने बाळगावा असे आवाहन सद्‌गुरु भाऊ महाराज यांनी केले. 

बेतोडा पारवडेश्‍वर मठात नामस्मरण तसेच पूजाविधीचे आयोजन केले जात असून मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्माचा पुरस्कार महत्त्वाचा ठरला असल्याचे भाऊ महाराज यांनी सांगितले. 

दरम्यान, बेतोडा तसेच पारवाड येथील मठातही विविध उपक्रमांद्वारे भाविकांना मार्गदर्शन करण्यात येत असून सद्‌गुरु भाऊ महाराज यांचे आशीर्वचन लाभत असल्याने मानसिक स्वास्थ्यासाठी ते उपयुक्त ठरले असल्याचे भाविकांकडून सांगण्यात आले. 

संबंधित बातम्या