कोरोनाने हणजूण फ्ली मार्केटचे वैभव हरपले

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

गोव्यात पर्यटनाची नांदीसुद्धा वाजली नव्हती अशा काळापासून ते आजतागायत बार्देशातील हणजूण येथील निसर्गरम्य परिसरात दर बुधवारी भरणाऱ्या फ्ली मार्केटचा कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा बोजवारा उडाला असून त्यामुळे शेकडो लोकांचा व्यवसाय तसेच स्थानिक  पंचायतीला मिळणारा लाखोंचा महसूल पूर्णपणे बुडाला आहे.

शिवोली : गोव्यात पर्यटनाची नांदीसुद्धा वाजली नव्हती अशा काळापासून ते आजतागायत बार्देशातील हणजूण येथील निसर्गरम्य परिसरात दर बुधवारी भरणाऱ्या फ्ली मार्केटचा कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा बोजवारा उडाला असून त्यामुळे शेकडो लोकांचा व्यवसाय तसेच स्थानिक  पंचायतीला मिळणारा लाखोंचा महसूल पूर्णपणे बुडाला आहे.पहिल्या आठवड्यापासून मार्च- एप्रिलपर्यत हाऊसफुल्ल चालणाऱ्या येथील फ्ली-मार्केटचा यंदाच्या वर्षी शुभारंभ करण्यास स्थानिक पंचायत मंडळ  सरकारकडून राज्यातील पूर्णपणे हटविण्याच्या निर्णयाचे डोळ्यांत तेल घालून वाट पाहात असल्याचे दिसून आले.

 दरम्यान, एकेकाळी हणजूण येथील डिमेलोवाड्यात  चौफेर पसरलेल्या शेतजमिनीत  हिप्पी कल्चरच्या नावाने भरणाऱ्या फ्ली मार्केटचा चेहरा  आजच्या घडीस पूर्णपणे  बदलून गेल्याचे दिसत आहे.  जीवनाची अनुभूती घेण्यासाठी गोव्याच्या भूमीत कांही काळ घालविल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी ताब्यातील शिल्लक सामान (उदा : घड्याळ, छोटा ट्रांन्सिस्टर , टेपरेकॉर्डर, सायकल आदी वस्तू ) स्थानिकांना मिळेल त्या दरात विकून मायदेशी परतणाऱ्या हिप्पींंचा बाजार अशी एकेकाळी  ख्याती प्राप्त झालेल्या फ्ली मार्केटने सध्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक रुप प्राप्त केले आहे.

दरवर्षी भरणाऱ्या येथील मार्केटचा सोपोकर तसेच लिलाव सध्या लाखोंच्या घरात जात असतो यांवरूनच येथील फ्ली मार्केटचे आजचे स्वरूप ध्यानात घेता येईल. दर बुधवारी डिमेलोवाड्यात भरणाऱ्या येथील फ्ली मार्केटात भारतीय वास्तुशि्ल्प, प्राचीन मूर्ती, काश्मीरपासून हिमाचल प्रदेशचे विविध कलाकुसरीने तयार केलेली चांदी तसेच सोन्याचे दागिने, गुजरात ते राजस्थान येथील पारंपरिक साड्यांचा खजाना, तसेच तामिळनाडूपासून ते केरळपर्यंतच्या विविध प्रकारच्या मसाल्यांचे पदार्थ, परप्रांतीय महिला तसेच पुरुष विक्रेते विदेशी ग्राहकांना आकर्षित करीत असतात.

दरम्यान, किरकोळ वस्तूंसाठी  हजारोंची रक्कम लाटून विदेशींना जबर आर्थिक फटकाही देण्याचे काम येथील मार्केटात राजरोसपणे होत असते. जो तो व्यापारी  अधिकाधिक पैसा कमावण्याच्या हेतूनेच येथील मार्केटात प्रवेश करत असल्याने कोण कुणाला कसा काय फसवेल या गोष्टीचे या भागात कुणालाच सोयरसुतक  नसते. दरम्यान, दरवर्षी लाखोंची उलाढाल करणाऱ्या येथील फ्ली मार्केटचे वैभव सध्या धुळीस मिळालेले असून राज्यातील सर्व व्यवहार  जोपर्यंत पूर्णपणे खुले होणार नाहीत तोपर्यंत तरी येथील गतवैभव पुन्हां प्राप्त होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. 

हणजूणवासीयांची इच्छा आहे. शेकडों लोकांच्या व्यवसायाला हातभार लावणारे येथील मार्केट या भागातील स्थानिक टॅक्सीचालक तसेच छोटे मोठे व्यापारी तसेच परप्रांतीय लोकांच्या उपजीविकेचे साधन असल्याने राज्यातील लॉकडाऊन उठताच त्याबाबतीत सोपस्कार सुरू करण्यात येतील.
-सावियो आल्मेदा. (सरपंच-हणजूण-कायसूव)

संबंधित बातम्या