नवरात्रोत्सवातही कोरोनाचा प्रभाव राहणार कायम

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

नवरात्रोत्सवाच्या काळात देव-देवतांची मंदिरे नेहमी गजबजून जातात. भाविकही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या उत्सवात रंगत वाढवतात. पण, यंदा ‘कोरोना’चे सावट असल्याने आता हा उत्सव अगदी साध्यापणाने साजरा होणार आहे. तरीही कलाकारांनीही मात्र, चित्र शाळांमध्ये देवीची मूर्ती तयार करण्यावर भर दिलेला आहे. 
 

पणजी: राज्यातील विविध देवालयात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यंदाही हा नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार होता. पण, यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे नवरात्रोत्सव नेटक्या स्वरुपात न होता साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी देवस्थान समित्यांनीही तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘शारदोत्सव’ काळात देवालयात हजेरी लावणाऱ्या भाविकांवर या वर्षी हिरमुसलेपणा होणार आहे.

कीर्तन, प्रवचन, भजन, गायन, स्पर्धा, गर्भानृत्य, दांडिया, घुमट आरत्या अशा सर्वच कार्यक्रमांना यंदा लोकांना मुकावे लागणार आहे. नवरात्री उत्सव आणि दांडिया हे तर आता समीकरणच झाले होते. उत्सवाची चाहुल लागताच तरुण तरुणी दांडियाची तालीम करण्यात मग्न असायचे. यंदा मंदिरातून, गल्ल्यांमधून दांडियाची धूम नसेल, त्यामुळे तरुणाईच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यंदाचा नवरात्री उत्सव मुळापासून चालत आलेल्या धार्मिक विधीं पुरताच मर्यादित करावा लागणार आहे.

गोव्यातील मंदिरांमध्ये या उत्सवकाळात नऊ रात्री कीर्तने चालायची. यातून प्रबोधात्मक विषय पूर्व रंगातील संतांच्या अभंग रचनेतून व उत्तररंगातील कथानकातून मांडले जायचे. अंत्रुज महालातील देवालये तर भाविकांच्या वर्दळीने डोळ्यात फुलून जायची. तिथे भक्तीने ओथंबलेले वेगळे वातावरण अनुभवायला मिळायचे. देवींना मखरात बसवून साजरा होणारा वैशिष्ट्यपूर्ण माखरोत्सव सोहळा तर डोळ्यात साठवून घेण्यासारखा असतो.

अलीकडे नवरात्री उत्सवात दांडियाचे पेव एवढे फुटले आहे, की तरुणाईच्या उत्साहाला उधाण येते. त्यांच्यासोबत बायका, मुले, उत्साही मोठी माणसेही दांडिया खेळण्यात रंगून जातात. यंदा हे चित्र पहायला मिळणार नाही. फुगडी, घुमट आरती स्पर्धाही नवरात्री उत्सवात मोठ्याप्रमाणात घेतल्या जायच्या त्याही यंदा घेतल्या जाणार नाही. नऊरात्रीची ही मजा यंदा लुटता येणार नाही.

बहुतेक मंदिरांच्या कार्यकारी मंडळांनी नवरात्री उत्सव बेतानेच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे व तो योग्यच आहे. गोव्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे, तेव्हा या उत्सवावेळी होणाऱ्या गर्दीमुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडून त्यात भरच पडणार होती. यंदा शाळांमधून व सार्वजनिकरित्या साजरे होणारे शारदोत्सवही साजरे होणार नाहीत. किंवा मर्यादित स्वरूपातच साजरे होतील, असे सध्यातरी दिसते.

आमच्या मंदिरात आम्ही दरवर्षी नवरात्री उत्सव व शारदोत्सव भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करतो. तरुण मंडळी त्यात सक्रीय सहभागी होतात. भजन, कीर्तन, प्रवचन, फुगडी स्पर्धा, मुलांसाठी विविध स्पर्धा, गायन, दांडिया, घुमट आरत्या असे विविधांगी कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. पण, यंदा या सर्व कार्यक्रमांना फाटा देऊन, मोजके धार्मिक कार्यक्रम फक्त आम्ही करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्री उत्सव व शारदोत्सव आम्ही साजरे करणार. पण, मर्यादित स्वरूपात. यंदा तरुण मंडळीच्या उत्साहावर विरजण पडेल. पण, आपण काळजी तर घ्यायला हवी आणि सगळ्याच देवळात अशा पद्धतीने यंदा नवरात्री उत्सव साजरा करण्यावाचून गत्यंतर नाही हेही तेवढेच खरे.
- किशोर नार्वेकर (अध्यक्ष - सातेरी ग्रामदेवता देवस्थान, कार्मिभाट-मेरशी)

खोर्णवाडा-रायबंदरच्या सरस्वती सांस्कृतिक मंडळातर्फे गेली ९० वर्षे (आमच्या वाडवडिलांपासून) सरस्वती पूजन उत्सव धुमधडाक्यात
साजरा करतोय. दरवर्षी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. एकांकिका स्पर्धा, फुगडी स्पर्धा, अभंगगायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण भरगच्च स्पर्धाही घ्यायचो. यंदा मात्र ‘कोविड-१९’मुळे कोणतेही कार्यक्रम करणे शक्य नसल्याने खंड पडणार आहे.
- नंदेश कांबळी (कार्यकारी सदस्य - सरस्वती सांस्कृतिक मंडळ)

सरकारी प्राथमिक विद्यालय ,पानवेलचा पालक शिक्षक संघ व पानवेलकर कला आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दरवर्षी सरस्वती पूजन उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करतो. परंतु यंदा भजन, कीर्तन, विविध स्पर्धांना फाटा देऊन, मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम वगळून साधेपणाने उत्सव साजरा करणार आहोत. आमचा हा उत्सव दोन दिवस असतो. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन व दुसऱ्या दिवशी विसर्जन असते. यंदा मातीची मूर्ती न पूजता सरस्वतीच्या फोटोचे पूजन करावे, असे सुचविण्यात आले आहे. परंतु आम्ही परंपरेप्रमाणे मातीचीच मूर्ती पूजणार आहोत. गणपतीच्या मूर्ती पूजल्या गेल्या मग सरस्वतीची का नको, त्याने कोणता फरक पडणार आहे. गर्दी जमवणारे कार्यक्रम तर आम्ही करणार नाही. बाकी बार, मॉल अशी गर्दीची ठिकाणे मात्र सुरू आहेत.
- संदीप नाईक, पानवेल (आयोजन समिती कार्यकर्ता)

आम्ही आमच्या शाळेत दरवर्षी सरस्वती पूजन उत्सव करतो. परंतु यंदा मुलेच नसणार तर मुलांशिवाय उत्सव करणे हे पटत नाही. तरीसुद्धा सरस्वती पूजन उत्सव आयोजित करून त्याचे व्हिडियो रेकॉर्डिंग मुलांपर्यंत पोचवणार आहोत. बाकी इतर कार्यक्रम मुलांच्या अनुपस्तिथीत होणार नाहीत. मुले उपस्थित असल्याशिवाय अशा कार्यक्रमाचा आनंद मिळणार नसल्याने तसा निर्णय घेतला आहे. 
- सौ. सरिता (विनया) धुपकर, माशेल (शिक्षिका)

संबंधित बातम्या