सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 'कोरोना' नियंत्रणाबाहेर : दिगंबर कामतांचा निशाणा 

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

कोरोनाबाबत सरकारने योग्य तयारीची तजवीज न केल्याने व बेजबाबदारपणामुळे लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने खर्च करण्यापेक्षा इतर प्रकल्पांवर वायफळ खर्च केल्याची चौफेर टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.

राज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव व मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ आहेत. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट राज्यावर आल्यापासून तयारी करण्याची मागणी वारंवार करण्यात आली मात्र सरकारने ते गंभीरपणे न घेता त्याकडे दुर्लक्ष केले त्याचा हा परिणाम आहे. विरोधकांनी केलेल्या सूचना सरकारने विचारात घेतल्या नाहीत मात्र टीका झाल्यावर त्याचे खापर सरकारने विरोधकांवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाबाबत सरकारने योग्य तयारीची तजवीज न केल्याने व बेजबाबदारपणामुळे लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने खर्च करण्यापेक्षा इतर प्रकल्पांवर वायफळ खर्च केल्याची चौफेर टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. ('Corona' out of control due to government's irresponsibility: Digambar kamats  target)

कोरोना रुग्णांसाठी राज्यात अत्याधुनिक दोन हजार खाटा उपलब्ध करून देणार:  ...

मडगाव येथून पंधरा मिनिटांच्या 'फेसबूक ऑनलाईन'वरून बोलताना कामत यांनी समस्य गोमंतकियांना नमस्कार करत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मॅथ्यू फर्नांडिस व इतरांना श्रद्धांजली व्यक्त केली. तसेच कोरोना काळातील कोरोना योद्धे, डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी काम केले त्यांचे अभिनंदन करून गोमंतकिय नेहमीच त्यांच्या उपकारात राहतील. ते म्हणाले की, गेल्यावर्षी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले व कोरोना महामारीसाठी तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते मात्र एका वर्षानंतर दुसरी लाट आली तरी देशात अजूनही काही झाले नाही हे आता उघड झाले आहे. भाजप सरकारचा  बेजबाबदारपणा व असंवेदनशीलतेमुळे आज गोवा राज्य दिवाळखोर झाले असून, गोमंतकीयांना कोविडच्या जबड्यात ढकलले जात आहे. आपल्या नाकर्तेपणासाठी विरोधकांना जबाबदार धरण्यापेक्षा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांनी केलेल्या विधायक सूचनांवर सरकारने कोणते निर्णय घेतले हे स्पष्ट करावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

कोरोनाचा उच्चांक; 24 तासात 2293 नव्या रुग्णांची नोंद

काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना उद्देशून केलेल्या भाषणाला आज विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी फेसबुक व्हिडीयो लाईव्ह द्वारे प्रत्युत्तर देत, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला. गोमंतकीयांनी कोविड महामारीत सरकारकडून कसलीच अपेक्षा न धरता आपली स्वतःची काळजी घ्यावी अशी हाक दिगंबर कामत यांनी दिली आहे. मुख्यंमंत्र्यांनी काल केलेल्या भाषणातून खरे तर सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचला गेला. केवळ घोषणाबाजी व आश्वासने देण्यापलिकडे सरकारडे ठोस कृती केल्याचे काहीच नाही हे लोकांना कळून चुकले, असे ते म्हणाले.   

गोव्यात कोविडाची दुसरी लाट येणार याची माहिती असूनही सरकार बेफिकीर राहिले. ‘तहान लागल्यावर विहीर खणायला जाणे’ या म्हणीप्रमाणे बेजबाबदार भाजप सरकार आता झोपेतून जागे होऊन गोव्यात प्राणवायूचा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा करते यावरून मागील एका वर्षात सरकारने केवळ उत्सव साजरे केले हे सिद्ध होते असा दावा  दिगंबर कामत यांनी  केला आहे. ‘दिवे लावा, टाळी वाजवा व थाळी वाजवा’ अशा उत्सवांमुळेच आज लोकांवर प्राणवायूसाठी तळमळण्याची पाळी आली आहे. 

मोटर सायकल पायलट, टॅक्सीचालक, रेंदेर, पोदेर, खाजेकार, फुलकार अशा कष्टकरी व्यावसायिकांसाठी शंभर कोटीचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी आम्ही केली मात्र सरकार गप्प आहे. सरकारला सामान्यांचे सोयरसुतक नाही. ‘गोंयचे दायज योजना’ चालीस लावण्यासही भाजप सरकारने विलंब केला. आज आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून, कोविड रुग्णांना इस्पितळात खाटा मिळत नाहीत. चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांना इकडून तिकडे पाठवले जाते. कुणाचा पायपोस कुणास नाही अशी भयानक परिस्थिती उद्भवली आहे, परंतु सरकारला त्याचे काहीच पडलेले नाही. 

मुख्यमंत्र्यानी काही दिवसांपूर्वी व्हिडीयो कॉन्फरंसिंगद्वारे बोलविलेल्या सर्व आमदारांच्या बैठकीत मी आठ मुद्दे सरकार समोर मांडले होते. परंतु, मुख्यमंत्री काल त्या मुद्यांवर गप्प राहिले. यावरून, भाजप सरकारला विरोधकांचे सल्ले घेणे गरजेचे वाटत नाही हे उघड होते अशी टिका दिगंबर कामत यांनी केली आहे. कोविड हाताळणीत आता राजकारण न करता सरकारने सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील कृती ठरवावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे. 

दहा हजार सरकारी नोकऱ्या युवकांना उपलब्ध करुन देणार अशी घोषणा केलेल्या मुख्यमंत्र्यानी काल केवळ तीन हजार नोकऱ्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून केवळ अर्ज मागवल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अशाच जाहिराती प्रसिद्ध करून ऐनवेळी सर्व सरकारी नोकऱ्या स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता याची आठवण दिगंबर कामत यांनी करून दिली. सरकार आज सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांनाही वेळेत मासिक अर्थसहाय्य करू शकत नाही असे सांगून, गृह आधार, लाडली लक्ष्मी, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग, विधवा अशा विविध लोकांना सरकार सहा- सात महिने  पैसे न देता ताटकळत ठेवत असल्याचे दिगंबर कामत म्हणाले. 

सरकारकडे गोमंतकियांना देण्यासाठी निधी नाही, परंतु नवीन राजभवन बांधण्याचा प्रस्ताव, विधानसभा संकुलाचे नुतनीकरण, मत्र्यांचे बंगले तसेच स्मृतिस्थळांवर सरकार कोट्यावधी रुपयांचा वायफळ खर्च करीत आहे. सरकारने गोवा मुक्ती लढ्यात सर्वस्व दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नाही परंतु त्या कार्यक्रमावर चार कोटी रुपयांची मात्र उधळपट्टी केली. नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेला व गोव्याला प्रगतिपथावर नेणारा ‘गोवा व्हिजन-२०३५’ अहवाल सन २०१२ पासून भाजप सरकारने कपाटात बंद करून ठेवला आहे. जो पर्यंत हा अहवाल चालीस लावला जात नाही तोपर्यंत गोव्याचा विकास अशाच खुंटत राहणार आहे. स्वार्थासाठी म्हादईचा सरकारने सौदा केल्याचे लोकांना कळले आहे, असे त्यांनी सांगितले.

श्वेतपत्रिका काढण्यास सरकार घाबरते 
सरकार आज राज्याची आर्थिक स्थिती, म्हादई जलतंटा, कोविड महामारी हाताळणी, पर्यावरण नष्ट करणारे तीन प्रकल्प व गोव्यातील ‘कोळसा केंद्र’ करणे यावर श्वेतपत्रिका काढण्यास घाबरत आहे. सरकारने योग्य आकडेवारीसह माहिती लोकांसमोर ठेवण्याची हिम्मत दाखवावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे. आज सरकार विरोधकांना कोविडचे राजकारण न करण्याचा सल्ला देतात. परंतु, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते टिका उत्सवात पक्षाचे बॅनर लावून प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न करतात. काल मुख्यमंत्र्यांनी केवळ भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली यावरून भेदभाव करण्याचे राजकारण कोण करते ते स्पष्ट आहे, असे आमदार कामत म्हणाले. सद्यपरिस्थितीत लोकांनी कोविडचे सर्व नियम पाळून काळजी घ्यावी. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या