फोंड्यात कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारावरून खळबळ

Dainik Gomantak
शनिवार, 27 जून 2020

फोंड्यात मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मध्यरात्रीच्यावेळी अशा प्रकारे गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचे कारण काय, असा सवाल केला आहे.

फोंडा

राज्यातील दोन कोरोना मृतदेहांवर फोंड्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यामुळे फोंड्यात खळबळ उडाली आहे. लोकांना कोणतीच कल्पना न देता, वाळपई व वास्को येथील दोन कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर फोंड्यात कसे काय अंत्यसंस्कार करण्यात आले, असा सवाल फोंडावासीयांनी केला आहे. दरम्यान, फोंडा पालिकेचे तीन नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक व विलियम आगियार यांनी पालिकेने त्वरित बैठक बोलावून याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.
फोंड्यात मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मध्यरात्रीच्यावेळी अशा प्रकारे गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचे कारण काय, असा सवाल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात या अंत्यसंस्काराला विरोध होता काय, म्हणून फोंड्यात विरोधी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघात अशा प्रकारे हे अंत्यसंस्कार झाले काय, असा सवाल दीपक ढवळीकर यांनी केला आहे. उद्या दुर्दैवाने कोरोना मृतांचा आकडा वाढला तर त्या सर्वांना फोंड्यातच आणले जाईल काय, अशीही विचारणा करण्यात आली आहे. लोकांना घाबरवून टाकण्याच्या याप्रकारात सरकारकडे कोणतेच नियोजन नाही, मागे शिरोडा कोरोना केअर सेंटरवेळीही असाच सरकारचा गोंधळी कारभार होता, त्यामुळे लोकांत घबराट पसरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे काय, असाही सवाल करण्यात आला आहे. यावेळी प्रताप फडते तसेच डॉ. केतन भाटीकर उपस्थित होते. या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी केतन भाटीकर यांनी केली आहे.
या भागाचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनीही कोरोना मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासंबंधी सरकारकडून योग्य नियोजन व्हायला हवे, लोकांना घाबरवून सोडू नये असे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, फोंडा पालिकेने यासंबंधी त्वरित बैठक घेऊन काय ते स्पष्टीकरण द्यावे अशा आशयाची मागणी करणारे एक निवेदन फोंडा नगराध्यक्षाना देण्यात आले आहे.

अंत्यसंस्कारासाठी वेगळी जागा निवडा
कोरोना रुग्ण मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी वेगळी जागा निवडायला हवी. वाळपई व वास्कोतील कोरोना मृतदेह फोंड्यात आणण्याचे कारणच नाही. तेथील लोकांचा विरोध आहे काय, मग फोंड्यात मुख्य रस्त्याच्या कडेला आणि लोकवस्तीजवळ अशा प्रकारे अंत्यसंस्कार करणे योग्य नाही. त्यासाठी सरकारने निर्मनुष्य ठिकाणी एखाद्या रानात किंवा लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी जागा निर्धारित करावी, तेथे शेड उभारावी व योग्य सुविधा उपलब्ध करून अशा ठिकाणी अंत्यसंस्कार व्हायला हवेत. दुर्दैवाने आणखी कोरोना रुग्णांचा मृत्यू होऊ नये, हीच प्रार्थना.
- रवी नाईक (आमदार, फोंडा)

संबंधित बातम्या