‘कोरोनासंबंधीच्या नियोजनाचा राज्यापालांनी ताबा घ्यावा’

dainik Gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

राज्यात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यास सरकार पूर्णपणे असफल ठरल्यामुळे कोरोनासंबंधी योग्यरित्या नियोजन करण्यासाठी गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ताबा घ्यावा, अशी मागणी गोवा आम आदमी पक्षाचे राज्य निमंत्रक एल्विस गोम्स यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

सासष्टी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार गोव्यातही होऊ लागलेला असून गोव्यात वाढणाऱ्या कोविड १९च्या रुग्णांमुळे गोव्यात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यास सरकार पूर्णपणे असफल ठरल्यामुळे कोरोनासंबंधी योग्यरित्या नियोजन करण्यासाठी गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ताबा घ्यावा, अशी मागणी गोवा आम आदमी पक्षाचे राज्य निमंत्रक एल्विस गोम्स यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
गोव्यात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांमुळे सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण झाले असून कोरोनासंबंधी नागरिकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता भासत आहे. नागरिकांना मार्गदर्शन न केल्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्यामुळे गोमंतकीय नागरिक गोंधळून गेलेले आहेत. गोवा सरकारही आता कोविड १९ आजारावर नियंत्रण आणण्यास असफल होत चालल्याचे दिसून येत असून अशा स्थितीत राज्यापालांनी जबाबदारी स्वीकारणे महत्वपूर्ण बनलेले आहे, असे एल्विस गोम्स यांनी सांगितले. यावेळी गोवा आपचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर उपस्थित होते.
गोव्यात कोरोना विषाणू हा मांगोरहिलपुरता मर्यादित राहिलेला नसून सर्वत्र गोव्यात कोविड १९ आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना विषाणूवर उपाययोजना करण्यासाठी गोव्यातील शिक्षकांच्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु या सर्वेक्षणाची माहिती सरकारद्वारे अद्याप पुरविण्यात आलेली नाही. सरकार कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यास अपयशी होत चालल्यामुळे गोमंतकीयांनी आता सरकारवर निर्भर न राहता, कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे बनले आहे, असे एल्विस गोम्स यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका गोव्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसलेला असून अशा स्थितीत मंत्र्यांना देण्यात येणारी एस्कॉट सेवा बंद करणे महत्वाचे आहे. कोरोनासंबंधी मुख्यमंत्री, मंत्री व आमदार लोकांना फक्त आश्वासन देण्याचे काम करीत असून कोरोना विषाणूवर रोख लावण्यास सरकारला यश मिळाले नाही, असे प्रदीप पाडगावकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या