साखळीत कोरोना पॉझिटिव्ह वाढले

dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

साखळीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज (शुक्रवारी) एकाच दिवसात साखळीत आणखी अकरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे. साखळी सामाजिक आरोग्य केंद्रातील एक परिचारिकाही पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली

संबंधित परिचारिका फोंडा तालुक्‍यातील असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूने संसर्गाच्या विळख्यात अडकलेल्या डिचोली शहरात मात्र आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे समजते. साखळीतील रुद्रेश्वर कॉलनी - हरवळे येथे आठ, देसाईनगरमधील बफर झोनमध्ये दोन, तर अन्य भागात एक मिळून आज एकाच दिवसात अकरा कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
सर्वण, म्हावळिंगेत चाचणी
मागील बुधवारी गोकुळवाडा-सर्वण येथे आढळून आलेल्या कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आलेल्या ३५ जणांची, तर काल आढळून आलेल्या म्हावळिंगे येथील एका कंपनीच्या कोरोना पॉझिटिव्ह वाहनचालकाच्या संपर्कात आलेल्या आठजणांची आज स्वॅब चाचणी करण्यात आली. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने ही चाचणी केली. दरम्यान, गावठण-साखळी येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डिचोली आयडीसीमधील एका आस्थापनातील कामगारांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

तालुक्‍यात पन्नासहून अधिक रुग्ण!
साखळी शहरात आतापर्यंत आढळलेले ४५, साळमधील ४, गोकुळवाडा-सर्वण येथील पिता-पुत्र मिळून दोन आणि डिचोली आणि म्हावळिंगे-लाडफे येथील प्रत्येकी एक मिळून डिचोली तालुक्‍यात आजपर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० च्या वर पोचली आहे.

संबंधित बातम्या