कोरोनामुळे गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाचा टक्का घटला ; मतमोजणी उद्या

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

कोविड महामारीच्या सावटाखाली आज झालेल्या उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठीच्या मतदानावेळी मतदानाची टक्केवारी ९.६१ टक्क्यांनी घटली. या निवडणुकीत राज्यात ५६.८२ टक्के मतदान झाले, यापूर्वीच्या २०१५ मधील निवडणुकीत ६६.४३ टक्के मतदान झाले होते.

पणजी :   कोविड महामारीच्या सावटाखाली आज झालेल्या उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठीच्या मतदानावेळी मतदानाची टक्केवारी ९.६१ टक्क्यांनी घटली. या निवडणुकीत राज्यात ५६.८२ टक्के मतदान झाले, यापूर्वीच्या २०१५ मधील निवडणुकीत ६६.४३ टक्के मतदान झाले होते. यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घेत, फारशा रांगा न लावता लोकशाहीतील पवित्र कर्तव्य मानले जाणारे मतदानाचे कर्तव्य बजावल्याचे दिसून आले. म्हावळिंगे आणि पंचवाडीतील बहिष्काराचा प्रकार वगळता इतरत्र मतदारांनी मतदानास बऱ्यापैकी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. 

 

 

मुक्तीची साठ वर्षे होऊनही अनेक गावे साध्या रस्त्यापासून वंचित असल्याचे वास्तव आज ठळकपणे समोर आले. मावळिंगेत रस्त्याच्या मागणीसाठी तर मापा पंचवाडीत स्मशानभूमीच्या मागणीसाठी बहिष्कार घालण्यात आला आहे. यापूर्वी सांगेतील साळजिणी आणि काणकोणमधील मार्ली व नडकेतील ग्रामस्थांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. मात्र त्‍यांनी आज मतदान केले. सकाळी साडेसात वाजता मतदानाचे प्रात्यक्षिक झाल्यानंतर आठ वाजता प्रत्यक्षातील मतदानास सुरुवात झाली. सगळीकडे सुरळीतपणे मतदान झाले. मात्र फातर्पा पंचायत मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण पहायला मिळाले. या मतदान केंद्रावर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सावित्री कवळेकर यांचा वावरास विरोधकांनी हरकत घेतली. कवळेकर या मतदान केंद्राच्या जवळ आल्यामुळे पोलिस व कवळेकर यांच्यात वाद झाला. दुसरी घटना पिसुर्ले गावकरवाडा व देऊळवाडा या मतदान केंद्रावरील आहे. या मतदान केंद्रांवर दुपारी तीनच्या नंतर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी वाहन पार्किंग करण्याच्या क्षुल्लक कारणावरून काही प्रमाणात वाद निर्माण झाल्यामुळे तेथे पोलिसांना पाचारण करावे लागले.

 

कोविडच्या भीतीमुळे अनेकांनी घरीच राहणे पसंत केले होते. सकाळी ८ ते दुपारी १० या दोन तासात केवळ १२.२६ टक्के मतदान झाले होते. उत्तर गोव्यात १२.२९ तर दक्षिण गोव्यात १२.२३ टक्के मतदान झाले होते. सकाळी ८ ते दुपारी २ या ६ तासात मतदान ३९.०६ टक्के झाले होते. उत्तर गोव्यात ३९.६२ तर दक्षिण गोव्यात ३८.४५ टक्के मतदान झाले होते. दुपारी ४ वाजल्यानंतर कोविड रुग्ण आलेल्या ठिकाणी इतर मतदार फिरकले नाहीत, मात्र इतर ठिकाणी सर्वसाधारण मतदार मतदानासाठी आले होते. रात्री ९ वाजेपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी मतदान पेट्या संरक्षित कक्षात जमा करण्यात येत होत्या.

 

उद्या मतमोजणी

सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी १५ ठिकाणे अधिसूचित करण्यात आली आहेत. उत्तर गोव्यात ६ तर दक्षिण गोव्यात ९ मत मोजणी केंद्रे आहेत.(मतमोजणी केंद्राची यादी पान २ वर)

 

असे झाले मतदान

राज्यात ४८ जागांसाठीच्या मतदानासाठी १ हजार १८७ मतदान केंद्रे होती. ७ लाख ९१ हजार ८१४ मतदारांपैकी केवळ ४ लाख ४९ हजार ८८८ जणांनी मतदान केले. ३ लाख ८५ हजार २२२ पुरुष मतदारांपैकी२ लाख २७ हजार ९१६ जणांनी तर ४ लाख ६ हजार ५९२ महिला मतदारांपैकी २ लाख २१ हजार ९७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उत्तर गोव्यात  ५८.४३ टक्के तर दक्षिण गोव्यात ५५ टक्के मतदान झाले.

 

अधिक वाचा :

बिंबल-सत्तरी येथे निवडणूक अधिकाऱ्यांची गाडी पलटली

गोवा पोस्टल चा ख्रिसमस निमित्त विशेष स्टॅम्प

गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाटचाल अर्ध्या लाखांकडे 

संबंधित बातम्या