सासष्‍टीतील सत्ताधारी आमदाराला कोरोना

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

१७ कोरोना रुग्ण आढळलेली मोतिडोंगर झोपडपट्टी ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर केली असून तेथील सर्व मार्ग ‘सील’ केले आहेत. १ जुलै रोजी मोतिडोंगर येथे पुन्हा स्वॅब चाचणीची मोहीम हाती घेण्यात येईल.

पणजी, मडगाव :

सासष्‍टीतील एका सत्ताधारी आमदाराला कोरोनाचा संसर्ग झाल्‍याचे मंगळवारी उघड झाले. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सत्ताधारी आमदाराला सोमवारी तापाची लक्षणे दिसल्‍याने मंगळवारी सकाळी त्‍यांची कोरोना पडताळणी चाचणी घेण्‍यात आली. या चाचणीचा अहवाल सायंकाळी पॉझिटिव्‍ह आल्‍याने घबराट निर्माण झाली. कोरोना लढाईत सॅनिटायझेशन तसेच नागरिकांना मदत करण्यात ते सत्ताधारी आमदार सक्रिय होते. कुंकळळी, बाळ्ळी परिसरात नुकत्‍याच झालेल्या कार्यक्रमात व शेतकऱ्यांना खत वितरण कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या संपर्कात असलेल्‍यांची तपासणी होण्‍याची शक्‍यता आहे.

मोतिडोंगर ‘कंटेन्मेंट झोन’
१७ कोरोना रुग्ण आढळलेली मोतिडोंगर झोपडपट्टी ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर केली असून तेथील सर्व मार्ग ‘सील’ केले आहेत. १ जुलै रोजी मोतिडोंगर येथे पुन्हा स्वॅब चाचणीची मोहीम हाती घेण्यात येईल. शनिवारी मोतिडोंगर येथील ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत २९७ जणांची स्वॅब चाचणी केली होती. त्यात १२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात त्या ज्येष्ठ नागरिकाची सून व नातवंडांचा समावेश आहे. १२ पैकी बहुतांश या ज्येष्ठ नागरिकाचे नातेवाईक असून वृद्धाच्या घराशेजारीच ते राहतात.

साखळीतील तीन प्रभाग
‘मायक्रो कंटेनमेंट झोन’
साखळीतील तीन प्रभागात ‘मायक्रो (सूक्ष्म) कंटेनमेंट झोन’ घोषित केला आहे. मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालिका मंडळासमवेत महत्त्‍वाची बैठक घेऊन ‘कोविड-१९’चा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कडक उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश पालिका मंडळाला दिले. त्यानंतर सायंकाळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आय. आर. मेनका यांनी कंटेन्मेंट झोनसंबंधीचा आदेश जारी केला आहे. देसाईनगर, भंडारवाडा आणि गावठण प्रभागातील काही भाग विकेंद्रीत करून ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’ घोषित केला आहे. तर तिन्ही प्रभागातील उर्वरीत भाग ‘बफर झोन’ जाहीर केले आहेत. गोकुळवाडा-सर्वण येथे कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

फातर्पातही संक्रमण वाढले
फातर्पा गावात मंगळवारी नवे ९ कोरोना संसर्गजन्य रुग्ण सापडले असून एकूण कोरोनासंक्रमितांचा आकडा ११ वर पोहचला आहे. सोमवारी सकाळी १४० जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल मंगळवारी आला असून ९ जण संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबेली पंचायत क्षेत्रात एक नवा रुग्ण आढळून आला असल्याची माहिती स्थानिक पंचायतीचे सरपंच डेनिका कुरैया यांनी दिली. आंबेलीत ५ जुलैपर्यंत टाळेबंदी लागू केली आहे. वेर्णा पोलिस ठाण्यात काम करणारा पोलिस शिपाई कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. हा पोलिस शिपाई आपल्या पत्नी, मुलांसह पोलिस क्वाटर्समध्ये राहत होता.

२४ तासांत ६४ पॉझिटिव्‍ह
कोरोनाचे राज्यात आज ६४ नवे रुग्ण आढळले, तर ७२ रुग्ण बरे झाले. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ७१६ झाली आहे. आजवर १ हजार ३१५ रुग्ण सापडले आहेत, तर ५९६ रुग्ण जण बरे झाले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेले ५९ प्रवासी गृह अलगीकरणात पाठवण्यात आले आहेत. देशांतर्गत प्रवास करून राज्यात आलेले ४०६ जण गृह अलगीकरणात पाठवले आहेत. संस्थांत्मक अलगीकरणात आज ७ जण गेले. कोविड चाचणी करण्यासाठी घशातील स्त्रावाचे २ हजार ११६ नमुने आज पाठवण्यात आले. १ हजार ८५८ नमनु्यांचे अहवाल प्राप्त झाले. आजवर राज्यात ६६ हजार ४९१ चाचण्या झाल्या आहेत. गोमेकॉतील अलगीकरण कक्षात ७ संशयित रुग्ण आहेत. संस्थात्मक अलगीकरणात ३४७ जण आहेत.

सापडलेले रुग्‍ण
सध्या उपचार सुरू असलेल्या ७१६ रुग्णांचे स्थानवार वर्गीकरण असे रस्ता, रेल्वे व हवाई मार्गे आलेले १०७, मांगोरहिलमधील २५५, मांगोरहिलशी संबंधित २१७, कुडतरी २१, मडगाव १२, आंबेलीशी संबंधित २३, केपे ६, लोटली ११, इंदिरानगर चिंबल १०, नावेली २, गंगानगर म्हापसा ६, साखळी २७, साळ ४, काणकोण ६, नास्नोळा १, पर्वरी २, वाडे वास्को १, कुंडई १, पिलार १, वेर्णा १, सांगे १ आणि पीर्ण १. आजवर जास्त रुग्ण आढळलेली ठिकाणे अशी सडा ६२, बायणा ४१, कुडतरी ३१, नवेवाडे २९, चिंबल २७, झुआरीनगर २४ आणि मोर्ले २२.
 

संबंधित बातम्या