औद्योगिक प्रकल्पांतील कामगारांमुळे कोरोनाचा प्रसार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऐन चतुर्थीच्या तोंडावर ही बाब चिंताजनक ठरली आहे. आतापर्यंत कोरोना रुग्ण हा झोपडपट्टीपुरता मर्यादित होता, मात्र आता नागरी वसाहतीबरोबरच ग्रामीण भागातही पोचला असल्याने लोकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे.

फोंडा: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऐन चतुर्थीच्या तोंडावर ही बाब चिंताजनक ठरली आहे. आतापर्यंत कोरोना रुग्ण हा झोपडपट्टीपुरता मर्यादित होता, मात्र आता नागरी वसाहतीबरोबरच ग्रामीण भागातही पोचला असल्याने लोकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे औद्योगिक वसाहती तसेच इतर भागातील प्रकल्पांकडून हा कोरोना आता अशा प्रकल्पांतील कामगारांमुळे गावागावात पोचला आहे. कोरोनाची महामारी आटोक्‍यात आणण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करताना चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

 

देशात इतर ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत असताना गोव्यात मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव झाला नव्हता. गोवा ग्रीन झोन जाहीर झाल्यानंतर सरकार आणि प्रशासकीय यंत्रणाही गाफील राहिली. मात्र नंतरच्या काळात झोपडपट्टीतून कोरोनाचा उद्रेक सुरू झाला, त्यात आरोग्य खात्याचे कर्मचारी व पोलिसांकडूनच कोरोनाची लागण व्हायला सुरवात झाली. नंतरच्या काळात हा कोरोना औद्योगिक वसाहतींकडून गावागावात पोचायला लागला. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील टुलीप या प्रकल्पाकडून सुरवात झाल्यानंतर अन्य अनेक उद्योग प्रकल्पांनी कोरोनाचा प्रसार केला. औद्योगिक वसाहती सोडून इतर भागात उभारलेल्या कारखाने व प्रकल्पातूनही कोरोनाचा प्रसार आता प्रभावीपणे सुरू झाला असून तिस्क - उसगाव येथील एमआरएफ या टायर उत्पादक कंपनीने प्रत्येक गावात कोरोना पोचवला आहे.

 

वास्तविक औद्योगिक वसाहती सुरू झाल्यानंतर प्रत्येक प्रकल्पाने आवश्‍यक ती खबरदारी घ्यायला हवी होती, मात्र उत्पादनाच्या नादात या खबरदारीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असून अजूनही औद्योगिक प्रकल्पांकडून प्रसार होत असलेल्या कोरोनावर कुणाचेच नियंत्रण नाही. सरकारने अशा औद्योगिक प्रकल्पांना कोरोनाबाबतीत कडक नियम करणे आवश्‍यक आहे, अन्यथा सबंध गोवा कोरोनाग्रस्त होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

औद्योगिक प्रकल्पांना द्या आदेश!

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी औद्योगिक प्रकल्पांना कोविडसंबंधी त्यांनीच आवश्‍यक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. कोविडसंबंधी एखादा कामगार अशा प्रकल्पांत सापडल्यास त्याला कॉरन्टाईन करण्याची जबाबदारी ही संबंधित प्रकल्पाची असायला हवी. एखाद्या प्रकल्पात कामगार कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यास त्याला कंपनीने विलगीकरणात ठेवताना घरच्यांना सावध केले पाहिजे, मात्र अशाप्रकारची काळजी घेतली जात नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून सरकारवर होत आहे, आणि सरकार याबाबतीत काहीच करीत नसल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या