कोरोनाची सर्वत्र दहशत

Dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

मागील आठवड्यात राज्‍यात रुग्‍ण सापडण्‍याचे प्रमाण प्रतिदिन २४ होते, हे प्रमाण आता दिवसाकाठी ४० ते ४५ पॉझिटिव्‍ह रुग्‍ण सरासरीने सापडण्‍याच्‍या प्रमाणापर्यंत पोहोचले आहे. मांगोरहिल, साखळी, काणकोण, मडगाव, लोटली, डिचोली, म्‍हापसा, वास्‍को, सत्तरी यासारख्‍या ठिकाणी रुग्‍ण आढळण्‍याचे सत्र सुरूच असून आज वेर्णा येथेही पहिला कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण सापडला आहे.

पणजी :

कधीकाळी ग्रीन झोनमध्‍ये असणाऱ्या गोव्‍यात आता प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या उंबरठ्यावर कोरोना पोहोचला आहे. लोकांच्‍या मनात प्रचंड प्रमाणात भीती पसरलेली आहे. गेल्‍या चोवीस तासात ५३ रुग्‍ण कोरोना पॉझिटिव्‍ह सापडले, तर ४६ जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा होऊन अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. त्‍यामुळे राज्‍यात ७२४ कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण असल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली. मागील आठवड्यात राज्‍यात रुग्‍ण सापडण्‍याचे प्रमाण प्रतिदिन २४ होते, हे प्रमाण आता दिवसाकाठी ४० ते ४५ पॉझिटिव्‍ह रुग्‍ण सरासरीने सापडण्‍याच्‍या प्रमाणापर्यंत पोहोचले आहे. मांगोरहिल, साखळी, काणकोण, मडगाव, लोटली, डिचोली, म्‍हापसा, वास्‍को, सत्तरी यासारख्‍या ठिकाणी रुग्‍ण आढळण्‍याचे सत्र सुरूच असून आज वेर्णा येथेही पहिला कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण सापडला आहे.
एकूण ७२४ रुग्‍णांमध्‍ये मांगोरहिल परिसरात २६०, मांगोर हिलसंबधीत २२२, याशिवाय पर्वरी, नास्‍नोडा, नवेवाडे, वास्‍को येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पिलार आणि वेर्णा येथे प्रत्‍येक एक रुग्‍ण आयसोलेशनमध्‍ये आहे. दरम्‍यान आरोग्‍य खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, आरोग्‍य खात्‍याने आज १४३० जणांच्‍या चाचण्‍यांसाठी नमुने गोळा केले होते, तर १४२० जणांचे अहवाल आरोग्‍य खात्‍याच्‍या हाती आले. तर ४३९ देशी प्रवाशांना आणि १७८ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्‍वारंटाईन केले आहे. इस्‍पितळातील आयसोलेशनमध्‍ये आज ४ जणांना ठेवण्‍यात आल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली.
दरम्‍यान रुग्‍णांमध्‍ये रस्‍ता, विमान आणि रेल्‍वेमार्गे आलेल्‍या १०४ रुग्‍णांचा समावेश आहे. तर ४१३ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

गोमेकॉतील ओपीडी
१ जुलैपासून सुरू
लोकांसाठी गोमेकॉतील बाह्य रुग्‍ण तपासणी विभाग (ओपीडी) १ जुलै पासून सुरू करण्‍यात येणार असल्‍याची माहिती मिळाली. ही ओपीडी पूर्वीप्रमाणे सेवा देणार असली, तरी यासाठीची आगावू वेळ फोनच्‍या माध्‍यमातून घ्‍यावी लागणार आहे. दरम्‍यान, गोमेकॉ येथेही यापूर्वी केशकर्तन करणारा व्‍यक्‍ती, शिपाई आणि शिकाऊ डॉक्‍टरसारखे कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण सापडले होते. त्‍यामुळे आता ओपीडी सुरू केली, तरी लोक या सेवेचा लाभ कितपत घेतील, याबाबत साशंकताच आहे.

संसर्गजन्‍य स्‍थळे
ठिकाण रुग्‍ण
मांगोरहिल २६०
बायणा ३१
ाकुठ्ठाळी ३१
सडा ६२
झुआरीनगर २४
मोर्ले २२
नवेवाडे २९

साखळी, मडगाव, कुठ्ठाळी भीतीच्‍या छायेत
आरोग्‍य खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार साखळीमध्‍ये २४ रुग्‍ण, मडगावमध्‍ये १७, कुठ्ठाळीमध्‍ये ३१ रुग्‍ण आढळल्‍याने लोकांमध्‍ये ‍या खळबळ माजली आहे. लोक घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करीत आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर त्‍यांच्‍या मनात असणारी भीती व्‍यक्‍त केली असून वाढत्‍या कोरोना रुग्‍णांमुळे लोकांच्‍या तणाव पसरत आहे. अनेक स्‍थानिक लोकांनी त्‍यांच्‍या परिसरात टाळेबंदी लागू करावी, अशी मागणी केली आहे.

पडताळणी चाचणी प्रमाण वाढवले : मुख्‍यमंत्री
ज्‍या ठिकाणी रुग्‍ण आढळत आहेत, त्‍या ठिकाणी आम्‍ही कोरोना पडताळणी चाचण्‍यांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे. कंटेंनमेंट झोनबद्दल काही निर्णय घेण्‍यात आला आहे का? असा प्रश्‍‍न विचारला असता निर्णय अजून झाला नसल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. मास्‍क घालणे सक्‍तीचे असल्‍याचेही ते म्‍हणाले. शिवाय माजी आरोग्‍यमंत्री जे कोरोना पॉझिटिव्‍ह आहेत, त्‍यांची प्रकृती स्‍थिर असल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री सावंत यांनी दिली.

संबंधित बातम्या