राज्यात ऐंशी टक्के रुग्‍ण ठणठणीत; ७२४ जण घरी परतले

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गुरुवारी ७९.८४ टक्के होते. आता त्यात ०.८४ टक्क्यांने वाढून ती ८०.६८ टक्क्यांवर पोहोचली आहे. 

पणजी: राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळे केवळ ३ जणांचा मृत्‍यू झाला. त्याचबरोबर ७२४ जणांची प्रकृती सुधारल्याने ते घरी गेले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८०.६८ वर पोहोचली आहे. राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गुरुवारी ७९.८४ टक्के होते. आता त्यात ०.८४ टक्क्यांने वाढून ती ८०.६८ टक्क्यांवर पोहोचली आहे. 

चोवीस तासांत ७२४ जण प्रकृती सुधारामुळे घरी परतले आहेत. आज दिवसभरात १ हजार ९८१ जणांचे कोरोनाविषयीचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. त्यात ५१९ जण पॉझिटिव्ह आढळले. घरगुती अलगीकरणात ३२५ जणांना मंजुरी मिळाली. त्याशिवाय २६९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्यात ५ हजार ६१४  सक्रिय रुग्ण आहेत. तीन मृतांमध्ये मयडे-बार्देश येथील ६३ वर्षीय पुरुष, कुडचडे येथील ५४ वर्षीय पुरुष, राय येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

वेलिंगकर १२२ वॉर्डमध्ये
भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (भाभासुमं) समन्वयक सुभाष वेलिंगकर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्‍यांना गोमेकॉत दाखल केले आहे. आपल्याला कोरोना झाल्याची माहिती त्यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. सध्या वेलिंगकर हे गोमेकॉतील कोविड राखीव १२२ वॉर्डमध्ये उपचार घेत असून, आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर दिली आहे.

पाच दिवसांत १७५ रुग्ण
राजधानीत कोरोना रुग्ण संख्या तीनशेच्यावर गेली आहे. सध्या पणजीत ३३९ रुग्ण झाले आहेत. मागील २१ ते २५ सप्टेंबर या पाच दिवसांत अनुक्रमे ३५+३५ +४२+ ३९+ २२ असे एकूण १७३ रुग्ण आढळले आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या