कोरोनाचा ‘डीएसएसएस’ लाभार्थींना फटका 

विलास महाडिक
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

केलेल्या सर्वेमध्ये सुमारे २३०० प्रकरणांमध्ये लाभार्थींचा ठावठिकाणाच नसल्याने या लाभार्थींना आर्थिक सहाय्य वितरण गेल्या फेब्रुवारी २०२० पासूनच बंद केले आहे. 

पणजी

गेल्या काही महिन्यांपासून ‘कोरोना’चा फटका राज्यभर सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना बसला असताना सरकारच्या कल्याणकारी योजनाही अडचणीत आल्या आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली (डीएसएसएस) ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमाह मिळणारे दोन हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य तीन महिने मिळालेले नाही. ऐन गणेशचतुर्थीत ही रक्कम वितरित होईल या आशेने हे ज्येष्ठ नागरिक बँकांमध्ये हेलपाटे मारत आहेत. 
समाज कल्याण खात्याकडे ‘डीएसएसएस’ या योजनेखाली १ लाख ३७ लाभार्थी असून त्यांच्यावर प्रतिमहिना सुमारे २६ कोटी रुपये आर्थिक सहाय्य वितरणासाठी लागतात. या योजनेखाली लाभार्थीच्या मृत्यूनंतर, बनवेगिरी दस्तावेज सादर करून, आवश्‍यक दस्तावेज सादर न केल्याने तसेच दोन योजनांचा लाभ घेणाऱ्यांची माहिती ‘जीईएल’तर्फे केलेल्या सर्वेमध्ये उजेडात आली होती. त्यामुळे सुमारे ३० हजार लाभार्थीना खात्यातर्फे नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये काही लाभार्थींनी दिलेले पत्ते चुकीचे किंवा त्या पत्त्यावर ते राहत नसल्याचे आढळून आले होते. एकूण पाठवण्यात आलेल्या नोटिसांपैकी सुमारे ३ हजारापेक्षा नोटिसा परत आल्या आहेत. त्यानंतर केलेल्या सर्वेमध्ये सुमारे २३०० प्रकरणांमध्ये लाभार्थींचा ठावठिकाणाच नसल्याने या लाभार्थींना आर्थिक सहाय्य वितरण गेल्या फेब्रुवारी २०२० पासूनच बंद केले आहे. 
राज्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर सरकारची अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर सरकारी कल्याण योजनांची अंमलबजावणी होत नाही. ही टाळेबंदी लागू झाल्यापासून एप्रिल २०२० पर्यंतच आर्थिक सहाय्यक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेखाली झाले आहे. मे, जून, जुलै या तीन महिन्यांचे आर्थिक सहाय्य वितरित केलेले नाही. समाज कल्याण खात्याने दरमहिना आर्थिक सहाय्य रक्कमेची बिले लेखा खात्याकडे वेळेत पाठवली गेली आहेत. मात्र, लेखा खात्याकडून ती मंजूर न होता पडून आहेत. सरकारकडे पुरेसा निधीच उपलब्ध नसल्याने ती वितरित न करता ठेवण्यात आल्याची मिळाली आहे. काही लाभार्थी हे सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्य रक्कमेवर दरमहिना अवलंबून असतात. मात्र, ती दरमहिना मिळणे बंद झाल्याने ते मेटाकुटीस आले आहेत. वारंवार बँकेत हेलपाटे मारून रक्कम खात्यावर आली आहे का? याची विचारपूस करूनही लाभार्थी कंटाळले आहेत. गणेशचतुर्थीला दहा दिवस बाकी आहेत तरी अजूनही सरकारने हे आर्थिक सहाय्य ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावर वितरित केलेले नाही. 
ज्या लाभार्थींचा मृत्यू झाल्यानंतरही तसेच ज्यांनी खोटे दस्ताऐवजद्वारे या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा सुमारे दहा हजार जणांना नोटिसा पाठवून रक्कम जमा करण्याच्या सूचना केल्या होत्या. ती न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीदही देण्यात आली होती. त्यामुळे बहुतेक जणांनी एकरक्कमी तर काहींनी दोन ते तीन हप्त्यांमध्ये जमा करण्यासाठी विनंती खात्याला केली होती. आतापर्यंत सुमारे १३ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. 

लेखा खात्याकडे बिले पडून 
समाज कल्याण खात्यातर्फे दर महिन्याला वेळेत ‘डीएसएसएस’ योजनेखालील लाभार्थींना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची बिले लेखा खात्याला पाठविली जातात. जुलै २०२० पर्यंतची सर्व बिले पाठविलेली आहेत. या बिलांनुसार लेखा खात्याने धनादेश जारी करून ते संबंधित बँकांना पाठवायचे असतात. त्यामुळे लाभार्थींसाठी आर्थिक सहाय्य वितरण खात्यातर्फे केले जात नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून लाभार्थींना रक्कम मिळण्यास झालेल्या विलंबाला समाज कल्याण खाते जबाबदार नसल्याचे उपसंचालक तहा हासिक यांनी माहिती दिली. 

 

 

goa goa goa 

 
 

संबंधित बातम्या