पोलिस मुख्यालयात कोरोनाची ‘एन्ट्री’

dainik gomantak
मंगळवार, 30 जून 2020

गेल्या काही दिवसांपासून त्याला ताप येत होता त्यामुळे तो रजेवर होता. मात्र त्याने दिसणाऱ्या या लक्षणांची माहिती सहकाऱ्यांना दिली नाही. त्याची कोविड - १९ चाचणी केली त्यामध्ये तो पोझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पणजी

पोलिस मुख्यालयातील राज्य गुन्हे नोंदणी विभागाशी (एससीआरबी) संबंधित असलेल्या एक पोलिस कर्मचारी कोरोना बाधित सापडल्याने पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या मुख्यालयातील विभागात या पोलिसासमवेत काम करत असलेल्या सर्वांची कोविड - १९ चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घटनेनंतर मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त भेटण्यास येणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 
राज्य गुन्हे नोंदणी विभागात काम करत असलेला पोलिस कर्मचारी हा साखळी येथील आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला ताप येत होता त्यामुळे तो रजेवर होता. मात्र त्याने दिसणाऱ्या या लक्षणांची माहिती सहकाऱ्यांना दिली नाही. त्याची कोविड - १९ चाचणी केली त्यामध्ये तो पोझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्याशी या विभागात काम करणाऱ्यांना तातडीने आज सकाळी चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले. हा चाचणी अहवाल येण्यास वेळ लागणार असल्याने पोलिस मुख्यालयातील अनेक अधिकारी
तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आज सकाळपासूनच पोलिस मुख्यालयाला भेट देणाऱ्यांवर निर्बंध लादण्यात आले होते. काही अधिकाऱ्यांच्या केबिनच्या दारावर टेबल्स लावून अडथळा निर्माण करण्यात आले होते. 
पोलिस मुख्यालयात कामाला असलेला पोलिस कर्मचारी हा कोरोना पोझिटिव्ह सापडल्याने काही पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतःच्या चाचण्या करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हा कर्मचारी पोलिस मुख्यालयातील अनेकांच्या कामानिमित्त संपर्कात आला होता त्यामुळे तेथे काम करणाऱ्या प्रत्येकाला स्वतःबद्दल भिती वाटू लागली आहे. कोरोनाची बाधा आपल्याला तर झाली नाही ना असा संशयही ते घेऊ लागले आहेत. एरव्ही हे मुख्यालय नेहमी गजबलेले असते मात्र या कर्मचाऱ्याची माहिती मुख्यालयात पसरल्यानंतर सामसूम दिसत होते. अधिकाऱ्यांच्या प्रत्येक केबिनच्या बाहेर सेनिटायझर्स बाटल्या स्टँडवर ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही जण वारंवार या सॅनिटायझर्सचा वापर करताना दिसत होते.  

 

 

संबंधित बातम्या