राज्‍यात कोरोनाचा नववा बळी

Tejshri Kumbhar
शुक्रवार, 10 जुलै 2020

बुधवारी (ता. ८ रोजी) मध्यरात्रीनंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नवेवाडे येथील युवकाचा ताप आल्याने मृत्यू झाला. नंतर काही वेळातच त्याचा अहवाल आला असता तो कोरोनाबाधित असल्याचे सिद्ध झाले. हा युवक दाबोळी विमानतळावर टॅक्सीचा व्यवसाय करीत होता. गेल्या सहा-सात दिवसापासून त्याला ताप येत होता. यावेळी अनेकांनी त्याला इस्पितळात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी त्याला अधिक ताप येत असल्याने त्याला प्रथम बायणा येथील खासगी इस्पितळात नेण्यात आले. तेथील इस्पितळातील डॉक्टरनी त्याला दाबोळी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला.

तेजश्री कुंभार/प्रदीप नाईक :

राज्यात ‘कोविड -१९’ महामारीने वास्कोतील चौथा बळी, तर गोव्यात एकूण नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वास्को नवेवाडे येथील मृत्‍यू झालेला युवक दाबोळी विमानतळावर टॅक्‍सी व्‍यवसाय करीत होता. त्‍यामुळे तो ‍कुणाच्‍या संपर्कात आला होता, याची चौकशी सुरू झाली आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ११२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली, तर ६६जण कोरोनामुक्त झाले. राज्यात सध्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८६९ असून १५८० जणांचे कोरोना पडताळणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

सात दिवसांपासून येत होता ताप...
बुधवारी (ता. ८ रोजी) मध्यरात्रीनंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नवेवाडे येथील युवकाचा ताप आल्याने मृत्यू झाला. नंतर काही वेळातच त्याचा अहवाल आला असता तो कोरोनाबाधित असल्याचे सिद्ध झाले. हा युवक दाबोळी विमानतळावर टॅक्सीचा व्यवसाय करीत होता. गेल्या सहा-सात दिवसापासून त्याला ताप येत होता. यावेळी अनेकांनी त्याला इस्पितळात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी त्याला अधिक ताप येत असल्याने त्याला प्रथम बायणा येथील खासगी इस्पितळात नेण्यात आले. तेथील इस्पितळातील डॉक्टरनी त्याला दाबोळी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला.

श्‍वसनाचा त्रास झाला आणि...
बुधवारी रात्री त्याला चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता सर्वप्रथम त्याची स्वॅब चाचणी करण्यात आली. रात्री त्याला खूपच ताप येत असल्याने येथील डॉक्टरांनी त्याला गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवले. तसेच त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले असता रात्री एक वाजता त्याचा मृत्‍यू झाला. दरम्यान चिखली उपजिल्हा इस्पितळात त्याची चाचणी केली होती ती पॉझिटिव्ह आली असल्याचे इस्पितळामार्फत सांगण्यात आले. गुरुवारी सायंकाळी या इसमावर वास्को मायमोळे येथे अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. यावेळी सरकारी अधिकाऱ्यांबरोबर त्या युवकाचे काही निकटवर्तीय उपस्थित होते.

आरोग्‍य खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, आजच्या दिवशी २ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना तर ८९ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ३३ जणांना ठेवण्यात आले. २३९० जनांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले तर २२५१ जणांचे अहवाल हाती आले आहेत. दरम्यान रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १०९ रुग्ण आहेत, तर मांगोरहिल परिसरातील ६४ आणि मांगोरहिलशी संबंधित ३०५ रुग्ण आहेत. केपे येथे १६, लोटली येथे ३०, नावेलीत ३, साखळी येथे ३४, काणकोणात ८, राय, कुंडई, थिवी, आगशी, नेरुल, नुवे, म्हार्दोळ, खोर्ली, बाणवली, कुंभारजुवे यासारख्या ठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण, मडगाव येथे ७, गंगानगर म्हापसा ७, साखळी येथे ३४, कामराभट टोंका येथे ७, फोंडा येथे ३२, वाळपईत १२, माशेल येथे ५, उसगावात ८, गोवा वेल्हा येथे ९, बेतकी येथे १०, सांगेत ४, कुंकळ्‍ळीत १८, करमळी येथे ३ रुग्ण असून राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या