साखळीत कोरोनाचा विळखा वाढतोय

dainik Gomantak
सोमवार, 29 जून 2020

साखळी शहरात कोरोना संसर्गाचा फैलाव बळावत असल्याने साखळीवासीयांची धास्ती वाढत आहे. आज (रविवारी) आणखी दोन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आजपर्यंत साखळीतील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा नऊवर पोचला आहे. आज देसाईनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानंतर लागलीच देसाईनगर परिसर ‘सील’ करण्यात आला.

डिचोली
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर मागील दोन दिवसांत साखळीतील मुजावरवाडा आणि भंडारवाडा ‘सील’ करण्यात आले आहे. आज सील करण्यात आलेल्या देसाईनगर येथेही पोलिस तैनात करण्यात आले आहेत. डिचोलीचे मामलेदार तथा साखळी पालिकेचे मुख्याधिकारी मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या निरीक्षणाखाली हा परिसर ‘सील’ करण्यात आला. यावेळी साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर, नगरसेवक ज्योती ब्लेगन, रश्‍मी देसाई, ब्रम्हा देसाई आणि आनंद काणेकर तसेच तलाठी अजित गावकर आणि नागरिक उपस्थित होते. देसाईनगर येथील नागरिकांची उद्या साखळी सामाजिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. उत्तम देसाई यांच्या निरीक्षणाखाली स्वॅब चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मामलेदार पंडित यांनी दिली. मामलेदारांच्या निर्देशानुसार डिचोली अग्निशमन दालतर्फे साखळी शहरात निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी करण्यात आली.

भंडारवाड्यावरील नागरिकांची चाचणी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या भंडारवाडा - साखळी येथील नागरिकांची आज (रविवारी) स्वॅब चाचणी करण्यात आली. साखळी सामाजिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. उत्तम देसाई यांच्या निरीक्षणाखाली वैद्यकीय पथकाने ही चाचणी केली. दरम्यान, उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार ‘सील’ केलेल्या भंडारवाडा भागातील जनतेला धान्य कोटा वितरीत करण्यात आला आहे. मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य कोटा पुरविण्यात आला.

संबंधित बातम्या