गोव्यात कोरोनोचे चोवीस तासांत दोन बळी

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

आज राज्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. ज्यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ६७९ इतकी झाली आहे.

पणजी: आज राज्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू झाले. ज्यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ६७९ इतकी झाली आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्याचा कोविडमधून बरे होण्याचा दरही ९५.९६ टक्के इतका सुधारला आहे. गेल्या चोवीस तासात १६७ लोकांना कोरोनाची लागण झाली तर ८५ रुग्ण कोरोना कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या एक हजार दोनशे एकवीस इतके कोविडचे सक्रिय रुग्ण आहेत. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात खाटांची संख्या २७५ इतकी असून सध्या २१४ खाट वापरासाठी उपलब्ध आहेत तर दक्षिण गोव्यात २१८ इतकी खाटांची संख्या असून सध्या २११ खाटा उपलब्ध आहेत. आज दिवसभरात ८१ लोकांनी गृह अलगीकरणाचा पर्याय स्वीकारला तर ३६ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात दोन हजार चार इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले. माहितीनुसार, डिचोली आरोग्य केंद्रात १९, म्हापसा आरोग्य केंद्रात ३७, पणजी आरोग्य केंद्रात ८७, चिंबल आरोग्य केंद्रात ६०, पर्वरी आरोग्य केंद्रात ८२, मडगाव आरोग्य केंद्रात १०२, कुडतरी आरोग्य केंद्रात २२, फोंडा आरोग्य केंद्रात ८२ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ७४ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ७१ रुग्ण इतके कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

काणकोणात नवे २० कोरोनाबाधित
काणकोणात १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर पर्यत वीस करोनाग्रस्त सापडले आहेत. १८ नोव्हेंबर पर्यंत कोरोनाची लागण झालेले ६८९ रूग्ण होते.२३ नोव्हेंबरला ती संख्या ७०९ झाली आहे. आता त्यापैकी ६५६ रूग्ण बरे झाले आहेत तर ४३ रूग्ण अद्याप उपचार घेत आहेत. वीस रूग्णापैकी सर्वाधिक  सात रूग्ण पालिका क्षेत्रातील राजबाग-तारीर येथील आहेत. त्या खालोखाल पालिका क्षेत्रात किंदळे येथील चार, पणसुले, चार रस्ता  येथील प्रत्येकी दोन, देळे येथील एक, गावडोंगरी, शेळेर व खोला येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

 

संबंधित बातम्या