डिचोली: ‘कोरोना’चा फटाके विक्रीवरही परिणाम

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

डिचोलीत ५० टक्‍के घट झाल्याचा अंदाज 

डिचोली, ‘कोरोना’ विषाणूमुळे गणेशचतुर्थी साजरी करण्यावर मर्यादा आल्याने यंदा चतुर्थीला लागणाऱ्या साहित्य खरेदीत मोठी घट घट झाल्याचे जाणवत आहे. दुसऱ्या बाजूने ‘कोरोना’मुळे यंदा फटाके खरेदीला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नसल्याने, यंदा फटाक्‍यांच्या मागणीत तर प्रचंड घट झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. 

डिचोलीतील एक घाऊक विक्रेते विद्याधर शिरोडकर आणि अन्य विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा फटाके खरेदीत जवळपास ५० टक्‍के घट झाली आहे. दरवर्षी चतुर्थी काळात साधारण पंधरा दिवस असतानाच फटाके  खरेदीला जोर येत असे. यंदा मात्र कोरोना संकटामुळे गणेशभक्‍तांमध्ये सुरवातीपासूनच फटाके खरेदी करण्याकडे कल नव्हता. त्यामुळे यंदा फटाके विक्रीवर मोठा परिणाम होणार असल्याचे संकेत मिळाले होते. ‘कोरोना’मुळे यंदा काही भागात दीड दिवसांची तर बहुतेक भागात पाच दिवसांची चतुर्थी साजरी करण्यात आली. 

बुधवारी सर्वत्र पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी खास करून पाच दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी फटाक्‍यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असे. यंदा मात्र बुधवारपर्यंत अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना महामारी संकटामुळे यंदा दुकानदारांनी अन्य साहित्याप्रमाणेच फटाकेही मर्यादित प्रमाणात उपलब्ध केले होते. तरीदेखील विक्रेत्यांकडे फटाक्‍यांचा बराच साठा शिल्लक राहिला असल्याचे समजते.

संबंधित बातम्या