शाळांमधील हरवला किलबिलाट

वार्ताहर
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे मोबाईलद्वारे अध्‍ययनात मुले व्‍यस्‍त; पालकही घेतात पाठपुरावा

कोलवाळ: लगबगीने शाळेत दाखल होणारी लहान मुले सध्या शाळेत उपस्थित राहत नसल्यामुळे सरकारी प्राथमिक शाळा मूक व बधीर असल्यासारखे चित्र पाहावयास मिळते. सकाळी राष्ट्रगीताने सुरू होणाऱ्या सरकारी प्राथमिक शाळांतील लहान मुलांचा किलबिलाट सध्या हरवला आहे.

बार्देश तालुक्यातील ६१ सरकारी प्राथमिक शाळा व ६ माध्यमिक शाळा सुरू असल्या तरी शाळेत शिक्षण घेणारी मुले ‘कोविड -१९’ मुळे घरीच बसून अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. बार्देश तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळांतून पहिले ते चौथीपर्यंत एकूण २ हजार ११९ व माध्यमिक शाळांतून पाचवी ते सातवीपर्यंत २४७ मुले स्वत:चा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.

‘कोविड -१९’ मुळे सरकारी प्राथमिक शाळांतील मुलांचा दररोजचा अभ्यास मोबाईलवरून व अभ्यासक्रमासंदर्भात तयार केलेल्या वर्कशीटच्या माध्यमातून घेतला जात आहे. मुलांना घरीच बसून अध्ययन करावे लागत आहे. बार्देश तालुक्यात प्राथमिक स्तरावर मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. मुलांना मातृभाषेतून लहान वयात शिक्षण देण्याचा काही पालकांचा आग्रह आहे.

ग्रामीण भागांतील बहुतांश मुले पहिली ते चौथीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतात. काही मोजकेच पालक मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण देण्यास उत्सुक असतात. परंतु, बहुतांश पालक आपल्या मुलांचा मराठी माध्यमातून चौथीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इयत्ता पाचवीपासून इंग्रजी माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांची नावनोंदणी करतात व पुढील उच्च शिक्षणही इंग्रजी माध्यमातूनच घेतले जाते.

कोविडमुळे शिक्षण खात्याने सरकारी प्राथमिक शाळेतील मुलांना मोबाईल व दररोजच्या अभ्यासक्रमाच्या वर्कशीट तयार करून मुलांना शिकवण्यासाठी शिक्षण खात्याने परवानगी दिली आहे. मुलांचा दररोजचा अभ्यासक्रम मोबाईलद्वारे मुलांना पाठवण्यात येत आहे. पालकांनी शाळेत येऊन स्वत:च्या मुलांच्या अभ्यासक्रमाच्या वर्कशीट गोळा करून त्या दररोज मुलांकडून अभ्यासक्रमानुसार भरून परत पालकांनी शाळेत जमा कराव्या लागतात. त्यामुळे पालकांना स्वत:च्या मुलांचा अभ्यास करवून घेण्यासाठी सवड काढून घरीच शिकवणी द्यावी लागते.

सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षिका प्रत्येक मुलाच्या पालकांशी संपर्क ठेवून मुलांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी पालकांना सूचना देतात. दररोज मुलांना दिलेली वर्कशीट पूर्ण करून शाळेत द्यावी लागते. प्रत्येक मुलाच्या वर्कशीटची फाईल तयार करून मुलाने किती अभ्यास पूर्ण केला आहे, याची नोंद शाळेत शिक्षक ठेवतात. तसेच वर्कशीटवरील अभ्यास योग्य पद्धतीने पूर्ण केला आहे की नाही, याचीही नोंद ठेवून त्यांदर्भात पालकांना सूचना केल्या जातात.

संबंधित बातम्या