२०२० @ कोरोना ; अभूतपूर्व कोरोनामय वर्षाने गोव्यास दिलेल्या कडू गोड आठवणींचा आढावा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

२०२० साली जर सर्वाधिक लक्षात राहणाऱ्या काही गोष्टी असतील तर त्या कोरोना या साथीच्या आजाराशी निगडित आहेत. कोरोनाचा शिरकाव जसा भारतात झाल्यानंतर देशभरात भीतीचे वातावरण होते तसेच वातावरण गोव्यातसुद्धा होते. कोरोना काय आहे, त्याचा प्रसार कसा होतो याची माहिती लोकांना मिळते ना मिळते तोच लॉकडाऊन पुकारण्यात आले. २०२० या सालाने अनेक कडू गोड आठवणी दिल्या असून कोरोनाच्या बाबतीतील हा आढावा...
 

पणजी : २०२० साली जर सर्वाधिक लक्षात राहणाऱ्या काही गोष्टी असतील तर त्या कोरोना या साथीच्या आजाराशी निगडित आहेत. कोरोनाचा शिरकाव जसा भारतात झाल्यानंतर देशभरात भीतीचे वातावरण होते तसेच वातावरण गोव्यातसुद्धा होते. कोरोना काय आहे, त्याचा प्रसार कसा होतो याची माहिती लोकांना मिळते ना मिळते तोच लॉकडाऊन पुकारण्यात आले. २०२० या सालाने अनेक कडू गोड आठवणी दिल्या असून कोरोनाच्या बाबतीतील हा आढावा...

 

 • देशासह गोव्यातसुद्धा २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन पुकारण्यात आला आणि गोव्यात रोजच्या जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली. दुकानातील जीवनवश्यक वस्तू संपल्या आणि लोकांनी वस्तू खरेदीसाठी एकच झुंबड केल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. 

 

 • लॉकडाऊन पुकारल्यानंतर ज्या पद्धतीने देशभरातील कामगार आपल्या मूळ घरी पोहचले त्याचपद्धतीने गोव्यातील कामगारसुद्धा त्यांच्या मूळ गावी परतले. या कालावधीत गोव्यातीलसुद्धा अनेक कामगार रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या मूळ घरी परतले मात्र रेल्वेच्या तिकीट बुकिंगपासून टी घरी पोहचेपर्यँत त्याना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. या कामगारांना काम नसल्याने अनेकांच्या पोटाचे हाल झाले. या कालावधीत त्यांच्या पोटाची खळगी भरावी म्हणून अनेकांनी त्यांच्या जेवणाची जबाबदारी उचलली. सरकारनेसुद्धा कामगारांना मोफत अन्न देण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. 

 

 • राज्य बोर्डाच्या परीक्षा इयत्ता दहावीच्या १९,१११ विद्यार्थ्यांनी दिल्या. ही परीक्षा मे २१ ते जून १ यादरम्यान झाली. या परीक्षांमध्ये सॅनिटायझर आणि मास्क तसेच सुरक्षित सामाजिक अंतर सक्तीचे करण्यात आले होते. 

 

 • सुरवातीच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी करण्याबाबत अनेक ठिकाणी विरोध झाला मात्र कोरून इस्पितळातील कर्मचाऱ्यांनी सुरवातीच्या काही दिवसात लोकांना न सांगता या मृत्यूंचे अंत्यसंस्कार केले. जसे दिवस सरत गेले तसे कोरोनाच्या मृतदेहामुळे कोरोनाचा प्रसार होत नाही हे लोकांपर्यंत जनजगृतीच्या माध्यमातून पोहचविण्यात आले. आणि आता परिस्थिती चांगली असून लोक पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करण्याचे धाडस दाखवत आहेत.

 

 • लक्षणे असणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक शक्तीची पडताळणी करण्यासाठी राज्यात विस्तारित पद्धतीचा सर्व्हे दारोदारी फिरून करण्यात आला. 

 

 • राज्यातील चर्चसुद्धा लॉकडाउनच्या या कालावधीत बंद होते. अनेक चर्चमध्ये रविवारचे आणि महत्वाचे मास हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. 

 

 • जिल्हा पंचायतीच्या निवडणुका २२ मार्च रोजी घेण्यात येणार होत्या मात्र केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन पुकारल्याने या निवडणुका १२ डिसेंबर रोजी झाल्या. 

 

 • राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वात लहान वयाच्या केवळ २ महिने वय असणाऱ्या बाळाचा मृत्यू झाला. गिरी येथील या बाळाचा मृत्यू कार्डीओजनीक शॉकमुळे झाल्याचे समोर आले होते. 

 

 • लॉकडाउनच्या या कालावधीत राज्यात जर सर्वाधिक कोणत्या क्षेत्राचे नुकसान झाले असेल तर ते पर्यटन क्षेत्राचे होते. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात पर्यटन क्षेत्राचे ७२०० कोटींचे नुकसान झाले होते. 

 

 • सात रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतर ग्रीन झोन झालेल्या गोव्यात पुन्हा कोरोनाच्या संसर्गाची सुरवात वास्को येथील मांगोर हिल परिसरातून झाली. एका ट्रक चालकापासून सुरु झालेला संसर्ग राज्यात सर्व ठिकाणी पसरला. 

 

 • सगळ्या टेन्शनच्या वातावरणात जर लोकांचे कोणी मनोरंजन केले असेल तर ते मिम्स तयार करणाऱ्या पोरांनी केले होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकांनां दिलेला संदेश "घाबरायची काहीच गरज नाही" तसेच महादेव जोशी यांनी सुरु केलेला "डायरेक्त्त चंद्रार:" यासारखे अनेक मिम्स या दिवसात चांगल्याच प्रमाणात व्हायरल झाले होते. 

 

 • राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने राज्यात लॉकडाउनमध्ये सीमा बंद करण्यात आल्याने दूध आणि भाजीपाला यासारख्या दैनंदिन वस्तूंचा तुटवडा भासत होता. 

संबंधित बातम्या