कोरोना बळींनी ओलांडला साडेतीनशेचा टप्‍पा; चोवीस तासांत ४०७ पॉझिटिव्‍ह

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आजच्या एकूण चाचण्यांपैकी २७५ जणांना घरगुती अलगीकरणात उपचार घेण्यास मंजुरी मिळाली.

पणजी: कोरोनामुळे मागील २४ तासांत ९ जणांचा बळी गेला. त्‍यामुळे राज्यातील एकूण बळींची संख्या साडेतीनशे (३५१) पार गेली आहे. दिवसभरात १ हजार ४११ जणांच्या चाचण्यांपैकी ४०७ पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आजच्या एकूण चाचण्यांपैकी २७५ जणांना घरगुती अलगीकरणात उपचार घेण्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे अशाप्रकारे घरगुती अलगीकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या १२ हजार ७ वर पोहोचली आहे. आज २२० जण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.

दिवसभरात ५३७ जण प्रकृती सुधारल्याने बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण ५ हजार ७८१ रुग्ण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. मागील २४ तासांत ९ जण दगावले, त्यात चोडण येथील ४९ वर्षीय पुरुष, चांदोर येथील ५८ वर्षीय पुरुष, मंडुर आजोशी येथील ५६ वर्षीय पुरुष, आगशी येथील ६२ वर्षीय पुरुष, वास्को येथील ६५ वर्षीय पुरुष, असोल्डे- केपे येथील ५१ वर्षीय पुरुष, वाळपई येथील ७३ वर्षीय पुरुष, थिवी येथील ६८ वर्षीय पुरुष आणि खारेबांध येथील ८६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

राजधानी पणजीत त्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. पणजी भागातील कोरोना संसर्गाची संख्या ११४० वर पोहचली आहे. दरदिवशी सरासरी ४० कोरोना संसर्ग रुग्ण सापडत आहेत तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात हे प्रमाण वाढत असून पणजी महापालिका क्षेत्रातील लोकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. डिचोली तालुक्‍यात रविवारी २१ सक्रिय रुग्ण आढळून आले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या