राज्यात दिवसभरात ३७४ रुग्ण वाढले तर ७ जणांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

अनेक आरोग्य केंद्रांची रुग्ण आकडेवारी शंभरावर तर काहींची दोनशेच्या पार पोहोचली आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ८३९ वर गेली आहे.

पणजी: कोरोनामुळे मागील २४ तासांत ७ जणांचा मृत्‍यू झाला. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या २३६ वर पोहोचली आहे. दिवसभरात १ हजार ५१५ घेतलेल्या स्वॅब चाचण्यांपैकी ३७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले, तर ९०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २४१ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, गेल्‍या अकरा दिवसांत पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची संख्‍या सरासरी ५०० होती. त्‍यात रविवारी घट झाली.

आरोग्य संचालनालयाने आज जाहीर केलेल्या बुलेटिननुसार सातजण दगावले आहेत. त्यात डिचोली येथील ६५ आणि ६० वर्षीय पुरुष, पर्वरी येथील ७५ वर्षीय पुरुष, सांकवाळ येथील ५५ वर्षीय महिला, वाडे -वास्को येथील ४२ वर्षीय पुरुष, शिरोड्यातील ६७ वर्षीय आणि भाटले- पणजी येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज दिवसभरात प्रकृती सुधारल्याने ५२८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्याशिवाय २१२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. राज्यात एकूण संक्रमित रुग्ण ४ हजार ७५४ झाले आहेत.

संचालनालयाच्या या आकडेवारीवर नजर टाकली, तर अनेक आरोग्य केंद्रांची रुग्ण आकडेवारी शंभरावर तर काहींची दोनशेच्या पार पोहोचली आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ८३९ वर गेली आहे.

पणजीत २२ पॉझिटिव्ह
पणजीत आज २२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आत्तापर्यंत पणजी शहर आरोग्य केंद्राच्या हद्दीत २२४ रुग्ण आहेत. तसेच भाटले येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. आजच्या चाचणीत १८ जून रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेलमधील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे.

आमदार हळर्णकर यांना गोमेकॉतून आज डिस्‍चार्ज
मागील बारा दिवसांपासून कोरोनावर उपचार घेणारे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना प्रकृती सुधारामुळे उद्या, सोमवारी गोमेकॉतून सोडले जाणार आहे. तर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना पुढील आठवड्यात खासगी रुग्णालयातून सोडले जाण्याची शक्यता आहे.

ईएसआयमध्ये मृत्यूची नोंद नाही!
मडगाव येथील कोविड रुग्णालयात आज एकही व्यक्ती मृत पावली नाही. ज्या सात व्यक्ती दगावल्या त्या गोमेकॉत उपचार घेत होत्या. त्यातील काही इतर गंभीर आजाराने त्रस्त होत्या.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या