राज्यात चोवीस तासांत चारजणांचा मृत्‍यू; तीन दिवसांत २९ बळी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

मृतांमध्ये कुंभारजुवे येथील ४५ वर्षीय पुरुष, साखळी येथील ७६ वर्षीय महिला, झुआरीनगर येथील ७४ वर्षीय पुरुष, पणजी येथील ७९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

पणजी: कोरोनामुळे राज्यात मागील २४ तासांत आज चौघांचा बळी गेला. मागील दोन दिवसांत २५ जण कोरोनाने दगावल्यानंतर मृत्यू संख्या चारवर आली आहे. राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी वर नजर टाकली तर पणजी, पर्वरी आणि साखळी येथील वाढलेली रुग्णसंख्या चिंताजनक आहे. 

मृतांमध्ये कुंभारजुवे येथील ४५ वर्षीय पुरुष, साखळी येथील ७६ वर्षीय महिला, झुआरीनगर येथील ७४ वर्षीय पुरुष, पणजी येथील ७९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज २ हजार ६६ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या, त्यात ६२८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २७६ जण घरगुती अलगीकरणात उपचार घेत आहेत. तर १९३ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. घरगुती अलगीकरणात  उपचार घेणाऱ्यांची राज्यातील संख्या १० हजार ५७३ वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत चार मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या ३१९ ( मंगळवारी ३१५) वर पोहोचली आहे. याशिवाय कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण ५ हजार ३७५ एवढी झाली आहे.

गोमेकॉ औषधालयाचे दोन कक्ष बंद
गोमेकॉ इस्पितळाच्या औषधालय विभागातील कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याने औषधालयाचे दोन कक्ष आज बंद ठेवण्यात आले. उर्वरीत दोन खिडक्यांवर औषधे दिली जात होती. औषधे घेण्यासाठी टोकन क्रमांक देण्यात येत होता. एकावेळी पाच जणांनाच खिडकीसमोर प्रवेश दिला जात होता. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या