राज्यात दिवसभरात ४७७ रुग्ण कोरोनामुक्त तर ३८५ जणांना लागण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

राज्य आरोग्य संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज ३ हजार ५८६ जणांचे स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी घेतले. त्यात २ हजार ८१३ जणांचे नमुणे निगेटिव्ह आले, तर ३८५ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

पणजी: एका बाजूला गणरायाच्या आगमनाची आस लागून राहिलेली आहे. जे कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते, त्यापैकी दिवसभरात आजारातून ४७७ जण घरी परतले आहेत. आत्तापर्यंत राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती ९ हजार ५४० आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वी जे लोक बरे होऊन गेले आहेत, त्यांच्या कुटुंबांना हा उत्सव बरेच काही शिकवून जाणारा ठरणार आहे. 

राज्य आरोग्य संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज ३ हजार ५८६ जणांचे स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी घेतले. त्यात २ हजार ८१३ जणांचे नमुणे निगेटिव्ह आले, तर ३८५ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याशिवाय आज दिवसभरात आरोग्य सुधारल्याने घरी परतलेल्यांची संख्या ४७७ होती. त्याशिवाय ३८८ जणांच्या स्वॅबचे नमुण्यांचे अहवाल येणे बाकी आहे.  

गेल्या चोवीस तासात बेतकी येथील ५९ वर्षीय, चिंबल येथील ३८ व ५३ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ७० वर्षीय महिला, सांगे येथील ७० वर्षीय पुरूष, नुवेतील ४५ वर्षीय पुरुष, पणजी (दोनापावला) येथील ३२ वर्षीय पुरूष, तसेच फोंड्यातील ६१ वर्षीय पुरूष, माजोर्डा येथील ५८ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. घरगुती आयसोलेशनमध्ये १८० जणांवर उपचार सुरू असल्याची नोंद आहे.  

दुसरीकडे या कोरोना महामारीमुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढू लागली असून आज ९ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १३५ वर पोहोचली आहे. या मृत्यू झालेल्यांच्या घटनांमुळे दुःखाचे डोंगर त्या-त्या भागात कोसळले असल्याने एका बाजूला सुखाची आणि दुसरीकडे दुखाची किनार उत्सवाच्या काळात दृष्टीस पडेल.

पणजीत पाच दिवसांत ७० रुग्ण
पणजी महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती दोनशेच्या आसपास राहिली आहे. आज दिवसभरात पणजीतील १९९ जण पॉझिटिव्ह असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर ७० बाधित रुग्ण आढळले आहेत. महापालिका परिसरात सध्या अपार्टमेंटमध्ये सुशिक्षितांच्या घरांतून कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसत आहे. यापूर्वी दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत होते, परंतु सध्याच्या अहवालावरून पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे सुशिक्षितांच्या सोसायटींमधील आहेत. त्यामुळे ती एक चिंतेची बाब बनली आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या