‘दाबे’ गावामुळे ‘झर्मे’ गावही कात्रीत..!

प्रतिनिधी
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

चतुर्थीसाठी सामान आणण्यात अडथळा, उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांना निवेदने सादर

वाळपई:  सत्तरी तालुक्यात म्हाऊस ग्रामपंचायत क्षेत्रातील दाबे गाव शुक्रवारी वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येमुळे सरकारने कंटेन्मेंट झोन जाहीर करून सर्व रस्ते बंद केले आहेत. परंतु दाबे गावच्या पुढील भागात झर्मे गाव आहे. दाबे गावात सर्व मुख्य रस्ते बंद करण्यात आल्याने झर्मे गावच्या लोकांनाही बाहेर जाता येत नाही. दाबे गावात जाहीर केलेल्या कंटेन्मेंट झोनमुळे आता झर्मे गावही कात्रित सापडला आहे. 

सध्या चतुर्थी तोंडावर आली असून, सणासाठी सामान खरेदी करणे आवश्यक आहे. म्हणूनच केवळ चतुर्थी सणापुरता तरी झर्मे गावच्या लोकांना दुचाकी गाडीने तरी सामान खरेदीसाठी रस्ता सोडावा, अशी मागणी करणारे निवेदन झर्मे गावच्या नागरिकांनी सत्तरीचे उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर, मामलेदार दशरथ गावस यांना सादर केले आहे.
 
नागरिक दत्ता गावस म्हणाले, दाबे गावात कंटेन्मेंट झोन आहे. त्यामुळे मुख्य रस्ता बंद आहे. पण, दाबे गावच्या पुढे आमचे झर्मे गाव आहे. गावातील लोकांना रेशनधान्य आणण्यासाठी, बँकेत जाण्यासाठी रस्ता बंद असल्याने जाता येत नाही. तसेच पाण्याचा पुरवठा करणारा टँक्कर येत नाही, सिलींडर वाहतूक करणारे वाहन येत नाही अशा अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच सरकारने चतुर्थीसाठी सामान खरेदी करता यावी म्हणून केवळ झर्मे गावच्या लोकांना त्यावेळी रस्ता खुला करावा अशी मागणी आहे. यावेळी कल्पेश गावस, धर्मा गावस, सर्वेश गावस, लक्ष्मण गावस, उल्हास गावस आदींची उपस्थिती होती. मामलेदार दशरथ गावस यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करु असे सांगितले आहे.
 

संबंधित बातम्या