राज्यातील मृत्‍यूचे सरासरी प्रमाण चिंताजनक; दोन दिवसांत २५ मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या ३००च्या पार जाणे ही निश्चित चिंतेची बाब आहे. आजही ११ जणांचा कोरोनामुळे जीव गेल्याने एकूण मृत्युमुखींची संख्या ३१५ वर पोहोचली आहे.

पणजी: गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २५ झाली आहे. जर मृत्यूची आकडेवारी अशीच राहिली, तर राज्‍यासाठी चिंताजनक आहे. या महिन्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सरासरी दिवसाला ४ वर आले होते. पण, काल (सोमवारी) चोवीस तासांत १४ जणांचा बळी गेला. त्यामुळे  राज्याची मृत्यूची संख्या ३००च्या पार झाली आहे.

गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या ३००च्या पार जाणे ही निश्चित चिंतेची बाब आहे. आजही ११ जणांचा कोरोनामुळे जीव गेल्याने एकूण मृत्युमुखींची संख्या ३१५ वर पोहोचली आहे. ऑगस्टच्या १५ तारखेपर्यंत कोरोनाचे ९८ बळी गेले होते, तर १५ सप्‍टेंबरपर्यंत ही संख्या ३१५ वर जाणे म्हणजे जवळपास सव्वा दोन पटीने ही संख्या वाढली आहे.

एका बाजूला कोरोना रुग्ण सापाडण्याची संख्या चिंताजनक आहे. अलीकडे ही आकडेवारी ५००च्यावर गेली आहे. अनेक लोक अगदी शेवटच्या ४८ तासांत उपचारासाठी दाखल होत असल्याने रुग्णांचे इतर आजार बळावलेले असतात. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात अशा रुग्णांवर उपचार करावे लागतात. त्यात तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते, हे वारंवार वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यातच लोकांनी चाचणी करून घेणे गरजेचे आहे. तरच मृत्यूचा दर कमी होण्यास एक प्रकारे मदत होऊ शकते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या