राज्यात कोरोनारुग्‍णांनी ओलांडला १७ हजारचा टप्‍पा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

सध्या राज्यात ३६३५ एवढे कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. दरम्‍यान, माजी खासदार तथा राज्य सरकारचे ‘एनआरआय’ आयुक्त नरेंद्र सावईकर हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह ठरल्याने चिंता वाढली आहे.

पणजी: कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. एक- दोन रुग्‍णांवरून वाढत जाणारी संख्‍या आता साडेचारशे - पाचशेने वाढत आहे. रविवारी ही संख्‍या १७ हजार ४ रुग्ण एवढी झाली, तर अजूनपर्यंत १३ हजार १८६ रुग्‍णांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली. रविवारी आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्‍यामुळे मृतांची एकूण संख्‍या १८३ वर पोहोचली आहे. तसेच मागील चोवीस तासांत ४५१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तर ४५७ रुग्णांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली. 

सध्या राज्यात ३६३५ एवढे कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. दरम्‍यान, माजी खासदार तथा राज्य सरकारचे ‘एनआरआय’ आयुक्त नरेंद्र सावईकर हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह ठरल्याने चिंता वाढली आहे. 

दरम्यान आजच्या दिवशी ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यामध्‍ये ईएसआय रुग्णालयात दाखल असणारा मडगाव येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असणारी ७२ वर्षीय वास्को येथील महिला, पेडणे येथील ५० वर्षीय पुरुष, नावेली येथील ७५ वर्षीय पुरुष, वेर्णा येथील ६० वर्षीय महिला यांचा समावेश आहे. आज दिवसभरात आरोग्य खात्याने २१३२ एवढ्या कोरोना पडताळणी चाचण्यांसाठी लोकांच्या लाळेचे नमुने गोळा केले आहेत. तर २२२९ जणांच्या चाचण्यांचे अहवाल आरोग्य खात्याच्या हाती आले आहेत. 

लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेही धास्‍तावले
लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्याकडे सातत्याने संपर्कात असलेले त्यांचे कार्यकर्ते, कामासाठी येणारे नागरिक आणि या राजकारण्यांच्या कार्यालयात असलेले कर्मचारी यांनाही कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य ठरले आहे. एखादा राजकारणी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आपणही पॉझिटिव्ह निघू, या धास्तीनेच काहीजण चाचणीसाठी  इस्पितळात धाव घेत आहेत. राजकीय नेते नागरिकांसाठी उपलब्ध होत नसल्याने लोकांची कामे रखडली आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या