मडगावात आजपासून ‘कोविड’ इस्‍पितळ कार्यान्‍वित

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

सर्व ओपीडी हॉस्पिसियोत हलवण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. मेडिसीन विभागातील रुग्णांना ११ रोजी सकाळी हॉस्पिसियोत हलवण्यात येईल. मेडिसीन विभागात सुमारे ४० रुग्ण आहेत. या मेडिसीन विभागासह इतर वॉर्ड कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येतील. - डॉ. दीपा कुरैया, हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक

मडगाव: येथील नवीन जिल्हा इस्पितळात ११ सप्टेंबरपासून कोविड इस्पितळ सुरू करण्यात येणार असून त्यासाठी काही दिवसांपूर्वी हॉस्पिसियोतून हलवण्यात आलेले सर्व बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) पुन्हा हॉस्पिसियोत नेण्यात आले आहेत. हॉस्पिसियोत सर्व ओपीडी उद्यापासून नियमितपणे सुरू होतील. कोविड इस्पितळासाठी खाटांची व इतर सुविधांची व्यवस्था युद्धपातळीवर सुरू आहे. 

गोवा वैद्यकीय इस्पितळाच्या डॉ. सुनंदा आमोणकर व डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्‍वाखालील वैद्यकीय पथके नवीन जिल्हा इस्पितळाच्या कोविड इस्पितळात रुग्णांवर उपचार करतील. या कोविड इस्पितळात कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. नवीन जिल्हा इस्पितळाची इमारत बांधून पूर्ण झाल्यामुळे हॉस्पिसियो इस्पितळाचे या महिन्यात स्थलांतर करण्यात येईल, असे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी जाहीर केले होते. हॉस्पिसियोचे सर्व ओपीडी व पूर्ण मेडिसीन विभाग नवीन जिल्हा इस्पितळात हलवण्यात आला होता. तसेच ओपीडी व मेडिसीन विभाग पुन्हा हॉस्पिसियोत हलवण्यात आला आहे.

२५० खाटांची क्षमता
नवीन जिल्हा इस्पितळात २५० खाटांचे कोविड इस्पितळ उद्यापासून सुरू करण्यात येत आहे. सुरवातीस थेट २५० रुग्णांना या इस्पितळात भरती करण्यात येणार नाही. या इस्पितळाच्या १३० खाटा इएसआय कोविड इस्पितळाला पुरवण्यात आल्याने जिल्हा इस्पितळात २५० खाटा उपलब्ध नाहीत. पण, कोविड इस्पितळ सुरू करण्याइतपत खाटा उपलब्ध आहेत. या इस्पितळात टप्प्याटप्प्याने रुग्ण दाखल करून घेण्यात येणार आहेत. तोपर्यंत २५० खाटांची व्यवस्था करण्यात येईल, असे हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपा कुरैया यांनी सांगितले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या