सांगेतील ‘एसबीआय’चा सुरू आहे खिडकीतून व्यवहार

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

‘कोरोना’ संसर्गाची भीती संपता संपत नसल्याने काही बॅंका ग्राहकांना सुरक्षित उपाय योजनाची आखणी करून व्यवहार करीत आहेत.

सांगे: ‘कोरोना’ संसर्गाची भीती संपता संपत नसल्याने काही बॅंका ग्राहकांना सुरक्षित उपाय योजनाची आखणी करून व्यवहार करीत आहेत. मात्र, सांगेतील भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) या शाखेचा आर्थिक व्यवहार खिडकीतून चालत आहे. या पद्धतीमुळे लोकांना त्रास होत असून, बॅंकेबाहेर लोकांची गर्दीही वाढत आहे. 

बॅंकेत गर्दी नको या कारणास्तव बॅंक व्यवस्थापकाने ही योजना आखल्याचे बोलले जात आहे. पण, खिडकीच्या बाहेर होणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीची जबाबदारी कोणी उचलावी, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे. ‘कोरोना’ महामारीत बरेच व्यवसाय ढासळले आहेत. व्यवसायात वृद्धी होत नाही. त्यामुळे बॅंका, वित्तसंस्था ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आटापिटा करू लागल्या असताना सांगेतील ‘एसबीआय’ बॅंकेच्या शाखेत ग्राहकांना प्रवेश न देता खिडकीतून व्यवहार करू लागले आहेत. 

खिडकीच्या बाहेर होणारी गर्दी सामाजिक अंतरात ठेवण्यासाठी या शाखेकडे कोणताही कर्मचारी नाही. ग्राहक मिळेल त्या पद्धतीने गर्दी करू लागले आहेत. मध्येच ऊन, पावसाचा मारा सुरू असतो. या कारभारात ग्राहक कंटाळले असून, स्वतःचे पैसे काढण्यासाठी नको ती परिस्थिती सांगे शाखेत निर्माण झाल्यामुळे इतर बॅंकात आजही सर्व सुरक्षा उपाय योजनांची अंमलबजावणी करून ग्राहकांना सन्मानाने आत प्रवेश देऊन व्यवहार केला जात आहे. असे असताना मात्र ‘एसबीआय’ शाखेत ग्राहकांना दिली जाणारी वागणूक कमी दर्जाची वाटू लागल्याने अनेक ग्राहकांनी या व्यवहारा संधर्भात नाराजी व्यक्त केली आहे. यात बॅंक उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष घालून इतर बॅंकाप्रमाणे सर्व सुरक्षा उपाय करून पूर्वी सारखाच ग्राहक सन्मान देण्यात यावा अशी मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे.

संबंधित बातम्या