राज्यात कोरोनाचे २४ तासांत ७ बळी; रुग्णसंख्या ११,९९४ वर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११,९९४ वर पोचली आहे. तसेच राज्यात आजवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा १११ झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात २८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर २०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पणजी: राज्यात कोरोनासंदर्भातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यभरात कोरोनाची भीती झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११,९९४ वर पोचली आहे. तसेच राज्यात आजवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा १११ झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात २८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर २०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ३८२५ सक्रिय कोरोनाग्रस्त आहेत. आजच्या दिवसात २०२५ जणांच्या लाळेचे नमुने गोळा करण्यात आले असून १९८४ जणांच्या चाचण्यांचे अहवाल हाती आले आहेत. दिवसभरातील २८४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

आज ज्या सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये कुडचडे येथील ६७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेला दक्षिण गोव्याच्या जिल्हा इस्पितळात मृत अवस्थेत आणण्यात आणले होते. वैद्यकीय तपासणीनंतर केल्यांनतर ही महिला कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. शिवोली येथील ८३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १५ ऑगस्ट रोजी झाला. चिंबल येथील ३५ वर्षीय व्यक्तीला गोमेकॉत मृत अवस्थेत आणण्यात आले होते. मात्र, तपासणीनंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. तसेच गोमेकॉत उपचार घेत असणाऱ्या फोंडा येथील ९१ वर्षीय पुरुषाचा आणि बायणा - वास्को येथील ६४ वर्षीय कोविड पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला. इएसआय रुग्णालय मडगाव येथे उपचार घेणाऱ्या कुंकळ्ळी येथील ६४ वर्षीय महिलेचा, हळदोणे येथील ५६ वर्षीय कोविड पॉझिटिव्ह महिलेचाही मृत्यू झाला आहे.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन, विमान आणि रस्तामार्गे आलेले ६२ रुग्ण आहेत. डिचोली आरोग्य केंद्रात २६, साखळी आरोग्य केंद्रात १२१, पेडणे आरोग्य केंद्रात १५८, वाळपई आरोग्य केंद्रात १४६, म्हापसा आरोग्य केंद्रात १२९, पणजी आरोग्य केंद्रात १८९, बेतकी आरोग्य केंद्रात ६३, कांदोळी आरोग्य केंद्रात ९३, कोलवाळे आरोग्य केंद्रात ९१, खोर्ली आरोग्य केंद्रात १०२, चिंबल आरोग्य केंद्रात २३४, पर्वरी आरोग्य केंद्रात १६६, कुडचडे आरोग्य केंद्रात ८७, काणकोण आरोग्य केंद्रात ३७, मडगाव आरोग्य केंद्रात ४८०, वास्को आरोग्य केंद्रात ३५३, लोटली आरोग्य केंद्रात ६३, मेरशी आरोग्य केंद्रात ६६, केपे आरोग्य केंद्रात ७९, शिरोडा आरोग्य केंद्रात ६८, धारबंदोडा आरोग्य केंद्रात १२६, फोंडा आरोग्य केंद्रात १९९ आणि नावेली आरोग्य केंद्रात ६२ रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. 

आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपचारासाठी दिल्लीहून एम्सचे पथक आज येणार
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचे खास पथक गोव्यात मंगळवारी दाखल होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी मंत्री नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनतर १३ ऑगस्ट रोजी लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी मणिपाल रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्यावर आतापर्यंत केले जाणारे उपचारही दिल्ली एम्स इस्पितळाच्या सहकार्यातूनच होत होते. मंत्री नाईक यांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा योग्य ठेवण्यासाठी त्यांना हाय फ्लो नसल ऑक्सिजन  (एचएफएनओ) वर ठेवण्यात आले आहे. एम्म्स, नवी दिल्ली येथून नुकतेच गोव्यात रुजू झालेल्या ट्रान्सफ्युजन मेडिसिन स्पेशालिस्ट यांच्या देखरेखीखाली आज त्यांना कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्माचा पहिला डोसही दिला गेला आहे आणि ते प्लाझ्मा थेरपीला चांगला प्रतिसाद देत आहेत. आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मणिपाल रुग्णालयाला भेट देत मंत्री नाईक यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधला आणि उपचाराबद्दलची माहिती घेतली.

उत्पल पर्रीकर यांची प्रकृती स्थिर
गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. उत्पल पर्रीकर यांनी काही दिवसांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोविडचे उपचार घेतले होते. शिवाय ते घरीही क्वारंटाईन झाले होते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यावरून मी रुग्णलयात दाखल होत असल्याची माहिती स्वतः पर्रीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या