अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर डिचोलीत भरला बाजार

प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

तब्बल बारा आठवडे म्हणजेच अडीच महिन्यांच्या प्र  तीक्षेनंतर अखेर आज बुधवारी (ता.२) डिचोलीत साप्ताहिक बाजाराची चाहूल जाणवली.

डिचोली: तब्बल बारा आठवडे म्हणजेच अडीच महिन्यांच्या प्र  तीक्षेनंतर अखेर आज बुधवारी (ता.२) डिचोलीत साप्ताहिक बाजाराची चाहूल जाणवली. पूर्वीप्रमाणे साप्ताहिक बाजार भरला नसला, तरी काही भाजी विक्रेत्यांनी आज साप्ताहिक बाजारात व्यवसाय सुरू केला. जवळपास ४० टक्‍क्‍यांहून अधिक विक्रेत्यांनी बुधवारी बाजारात आपला व्यवसाय थाटला होता. त्यामुळे अडीच महिन्यानंतर आज भाजी बाजारात ग्राहकांचीही वर्दळ जाणवत होती. कोरोना महामारीचा शहरात फैलाव होवू नये. त्यासाठी डिचोली पालिकेने गंभीर पावले उचलताना मागील जून महिन्याच्या १० तारखेपासून साप्ताहिक बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची कार्यवाही सुरू केली.

राज्याबाहेरून येणाऱ्या भाजीवाहू वाहने आणि विक्रेत्यांना बाजारात प्रतिबंध करण्यात आला होता. पालिकेच्या या कार्यवाहीमुळे त्यावेळी साप्ताहिक बाजारावर बऱ्याच मर्यादा आल्या होत्या. तर त्यानंतर आजपर्यंत साप्ताहिक बाजाराच्या दिवशी प्रामुख्याने भाजी बाजार भरलाच नव्हता. कालपासून राज्यातील सीमा खुल्या करण्यात आल्याने आज राज्याबाहेरील काही भाजीवाहू वाहने आणि विक्रेते बाजारात दाखल झाले होते. पूर्वीप्रमाणे काही विक्रेत्यांनी भाजी बाजारात आपला व्यवसायही सुरू केला.  प्लॅस्टिक, रेडीमेड कपडे आदी विक्रेत्यांनीही आज बाजारात मोर्चा वळवला होता. पूर्वीप्रमाणे बाजारात गजबजाट जाणवत नव्हता, तरीदेखील बाजार भरल्याचे चित्र जाणवत होते. ग्राहकही बाजारात भाजी आदी वस्तू खरेदी करताना दिसून येत होते. आजचे चित्र पाहता पुढील आठवड्यापासून, नियमितपणे साप्ताहिक बाजार भरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

संबंधित बातम्या