गणेशोत्सव मंडळांच्या आर्थिक उत्पन्नात घट, कलाकारांनाही फटका

वार्ताहर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

गेल्या वर्षाशी तुलना करता गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक उत्पन्न यंदा ‘कोविड १९’ मुळे केवळ पाच टक्क्यांवर येऊन ठेपले आहे.

म्हापसा: गेल्या वर्षाशी तुलना करता गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक उत्पन्न यंदा ‘कोविड १९’ मुळे केवळ पाच टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. मंडळांच्या अनेकविध उपक्रमांमुळे तसेच कार्यक्रमांमुळे दरवर्षी अनेक लहानमोठ्या व्यावसायिकांना विविध व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक प्राप्ती होत होती; परंतु, यंदा त्यांच्याही उत्पन्नाचा स्रोत नाहीसा झाला.

देणगी कुपने, स्मरणिका, जाहिरात छपाई, मंडप सजावट, विद्युत रोशणाई अशी कामे स्वीकारणाऱ्या ठेकेदारांना यंदा व्यवसाय प्राप्त होऊ शकला नाही. फुलांची आरास करणारे व्यापारी, रंगरंगोटी करणारे कंत्राटदार व त्यांचे कामगार तसेच संगीत, नाट्यविषयक, सांस्कृतिक तथा मनोरंजनपर कार्यक्रम सादर करणारे कलाकार या सर्व घटकांना त्याचा फटका बसला. तसेच, गणेशोत्सवाच्या मंडपाबाहेर फूलविक्री व फळविक्री करणाऱ्या लहानसहान व्यापाऱ्यांवरही परिणाम झाला. विसर्जन मिवणुकीच्या वेळी बँडवादन, भजन, दिंडी अशा स्वरूपाचे कार्यक्रम करणाऱ्यांना कुणी आमंत्रण न दिल्याने त्यांनाही मानधन मिळू शकले नाही. अर्थांत, सार्वजनिक मंडळांबरोबरच त्यांच्याशी संबंधित सर्व व्यवसायिकांनाही आर्थिक फटका बसला.

गणेशचतुर्थी हा गोमंतकीय जनतेचा सर्वांत मोठा उत्सव असतो. गोव्यात पोर्तुगीज राजवटीच्या काळापासून प्रत्येकाच्या घरोघरी तसेच परिसरात लहान-मोठा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रथा-परंपरा आहे. परंतु, यंदा कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या आर्थिक फटक्याची झळ यंदा म्हापसा शहरातील व परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही बसल्यामुळे यंदा बार्देश तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उत्पन्न साधारणतः पाच टक्क्यांवर येऊन पोहोचले. अर्थांत, गतवर्षीच्या तुलनेत ते आर्थिक उत्पन्न ९५ टक्क्यांनी घटले आहे. गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक उत्पन्न दरवर्षी उत्तरोत्तर वाढतच असायचे. पण, एवढ्या वर्षांनंतर प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने आर्थिक प्राप्तीबाबत नीचांक गाठला आहे.

गोवा मुक्तीनंतरचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून परिचित असलेला म्हापसा पालिका बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गणेशमूर्तीचा लौकिक सर्वत्र आहे. त्या ठिकाणचा गणेशोत्सव अनंतचतुर्दशीपर्यंत साजरा करण्याची प्रथा आहे. या मंडळाची वार्षिक आर्थिक उलाढाल चाळीस लाख रुपयांच्या आसपास असते. मंडळाचे पदाधिकारी दरवर्षी संपूर्ण म्हापसा शहरात व म्हापसा बाजारपेठेत फिरून वर्गणी गोळा करीत असत. तसेच, स्मरणिकेचे प्रकाशन करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करायचे. दरवर्षी सुमारे चाळीस हजार देणगी कुपनांची विक्री त्या ठिकाणी केली जायची. देणगी कुपनांची विक्री करून मिळणारे उत्पन्न हा मंडळाचा आर्थिक कणा असायचा. त्या कुपनांच्या विक्रीचा प्रारंभ श्रावण महिन्यात होत असे. तसेच, अनंतचतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव असल्यामुळे दानपेटीत गणेशभक्त लाखो रुपयांचे आर्थिक धन समर्पित करायचे. त्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य सिद्धिविनायक मंडप उभारला जात होता. परंतु, यंदा कोविडरूपी महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णतः रद्द करण्यात आले व त्यामुळे मंडप उभारला गेला नसल्याने मंडपात जाहिरातफलक लावून आर्थिक उत्पन्न वाढवणे आयोजकांना शक्य झाले नाही. विसर्जन सोहळ्यापूर्वी पावणीचा कार्यक्रम होत असे. त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळायचे. काही गणेशभक्तांनी केलेल्या नवसाच्या माध्यमातून श्रीला सोन्याचांदीचे दागिने अर्पण केले जात असल्यामुळे उत्पन्नात वृद्धी होण्यास हातभार लागत होता. परंतु, हे सर्व उत्पन्नाची माध्यमे यंदा नष्टच झाली.

दरवर्षीप्रमाणे यंदा गणरायाच्या दर्शनाला गर्दी सुमारे नव्वद टक्क्यांनी कमी होती. त्या सुमारे दहा टक्के गणेशभक्तांनी स्वत:च्या इच्छेनुसार वर्गणी दिल्याने तसेच दानपेटीत दान टाकल्याने गणेशोत्सव मंडळांना थोडेफार आर्थिक उत्पन्न प्राप्त झाले. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पाच दिवसांचा खर्च व जमा झालेल्या वर्गणीचा आकडा समान होईल. आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे सर्व सामाजिक उपक्रम रद्द करण्याची  पाळी गणेशोत्सव मंडळांवर आली आहे.

खोर्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आर्थिक उत्पन्न यंदा सुमारे पाच टक्क्यांपर्यंत घसरले आहे. यंदाचा तेथील गणेशोत्सव पाच दिवस असल्याने दरवर्षीच्या सर्व आर्थिक उत्पन्न देणाऱ्या योजना रद्द करण्यात आल्या. त्यामुळे, त्या मंडळाला आर्थिक फटका बसला आहे. वर्गणी गोळा करणे, स्मरणिका प्रकाशन करणे, जाहिरात फलक लावणे अशा गोष्टींना फाटा देण्यात आला. अत्यंत साधेपणाने तो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पाच दिवसांच्या काळात ज्या गणेशभक्तांनी स्वत:हून वार्षिक वर्गणी आणून दिली, तसेच, काही प्रमाणात फळफळावळीची जी ‘पावणी’ करण्यात आली व दानपेटीच्या माध्यमातून ते पाच टक्के आर्थिक उत्पन्न त्या मंडळाला प्राप्त होऊ शकले.

गणेशपुरी येथील श्री गणेश मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी एकवीस दिवस साजरा करण्याची प्रथा होती. त्या काळात मंडळातर्फे दरवर्षी देणगी कुपनांची विक्री केली जायची. त्यातून त्यांना चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्न व्हायचे. तसेच, स्थानिक रहिवाशांकडून वर्गणी व इतरांकडून प्रायोजकत्व व देणग्याही मिळायच्या. दानपेटीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढायचे. पण, यंदा तेथील देवस्थान समितीने हा गणेशोत्सव केवळ दीड दिवस साजरा केल्यामुळे दरवर्षीच्या सर्व आर्थिक योजना मार्गी लावणे शक्य झाले नाही. 

संबंधित बातम्या