डिचोलीतील विक्रेत्याला कोरोनाची लागण

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

चतुर्थी साहित्याचे स्टॉल बंद, तालुक्‍यात ४३ पॉझिटिव्ह

डिचोली:  डिचोली तालुक्‍यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून,  बुधवारी डिचोली बाजारात चतुर्थी साहित्याचा विक्री स्टॉल थाटलेला एक विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या प्रकारामुळे बाजारात चिंता पसरली असून, चतुर्थीच्या धामधुमीत या स्टॉलवाल्याच्या संपर्कात आलेल्यांची झोप उडाली आहे. दरम्यान, एक विक्रेता पॉझिटिव्ह आढळताच, संबंधित स्टॉलसह त्याला टेकून रांगेत असलेले चतुर्थी साहित्याचे अन्य स्टॉल प्रशासकीय यंत्रणेने बुधवारी सकाळी त्वरित बंद केले. कोरोनाबाधित आढळून आलेली व्यक्‍ती वाठादेव भागातील आहे. मागील आठवड्यात बाजारात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग बाजारापर्यंत पोचल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे.

एकाच दिवसांत ४३ रुग्ण..!
डिचोली तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा घटत असतानाच मागील तीन दिवसांच्या तुलनेत बुधवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली आहे. आज एकाच दिवसात तालुक्‍यात ४३ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. मये विभागात बुधवारी १४ तर डिचोली विभागात १२ आणि साखळी विभागात १७ मिळून ४३ रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारपर्यंत तालुक्‍यात कोरोनाचे ३३७ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. डिचोली मतदारसंघातील ८० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४७ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ३३ रुग्ण होम आयझोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. साखळी मतदारसंघातील १४४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७८ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ६६ रुग्ण होम आयझोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. मये मतदारसंघातील ११३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४८ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ६४ रुग्ण होम आयझोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर एका रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (बुधवारी डिचोलीतील २, मयेतील ४ आणि साखळीतील ६ मिळून बारा जणांना घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयाने दिली. 

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या पाळी भागात सॅनिटायझेशन करण्यात आले. मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या निर्देशानुसार डिचोली अग्निशमन दलातर्फे सॅनिटायझेशन करण्यात आले. या कामी तलाठी नारुलकर यांनी सहकार्य केले.

संबंधित बातम्या