गोमंतकीय वळताहेत मासे विक्री व्यवसायाकडे

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

मत्स्यविक्री व्यवसायात नव्याने आलेल्यांना आता चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्नही मिळू लागले. वास्तविक, ती तरुण मंडळी एरवी कमी पगाराच्या पांढरपेशा करण्यातच धन्यता मानीत होती.

म्हापसा: कोविडमुळे समाजात निर्माण झालेल्या एकंदर आर्थिक परिस्थितीमुळे गोमंतकीय तरुणवर्गाच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल होत आहे. अशा तरुणांपैकी काहीजण तर प्रथमत:च मासे विक्री व्यवसायाकडे वळलेले आहेत. अशाप्रकारच्या व्यवसायांत ते हळुहळू स्थिरस्थावरही होत आहेत.

कोविडमुळे टाळेबंदी जारी केली असता बार्देश तालुक्याची राजधानी असलेल्या म्हापसा शहरातील प्रमुख बाजारपेठ तसेच पर्वरी, कळंगुट, शिवोली, अस्नोडा इत्यादी उपनगरीय भागांतील छोटेखानी बाजारपेठा बंदच होत्या. गोव्यात मासे विक्रीचा व्यवसाय करणारे मूळचे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात त्या काळात स्वत:च्या गावांत परतले होते. त्यांनी गोवा सोडल्याने गोव्याच्या ग्रामीण भागांत तसेच शहरांच्या अंतर्गत भागांत मासळी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा अभाव होता. तीच संधी साधून काही गोमंतकीय तरुणांनी स्वत:च्या चार-चाकी वाहनांत मासळी घेऊन गोवोगावी रस्त्याकडेला मासे विक्री करणे सुरू केले आहे.

मत्स्यविक्री व्यवसायात नव्याने आलेल्यांना आता चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्नही मिळू लागले. वास्तविक, ती तरुण मंडळी एरवी कमी पगाराच्या पांढरपेशा करण्यातच धन्यता मानीत होती. तथापि, त्यापैकी कोविडमुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या होत्या, तर काही जणांना अगदीच कमी पगारात नोकऱ्या करणे भाग पडले होते. त्यामुळे अशा तरुणांनी त्या नोकऱ्या सोडून स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत.

अगोदर त्यांच्या बाबतीत अशा स्वरूपाचा विक्री व्यवसाय करणे हा लाज-लज्जेचा विषय होता. परंतु, शेवटी, दीर्घकालीन टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती खूपच खालावल्याने त्यांना नाइलाजाने असे व्यवसाय करणे अनिवार्य ठरले. आता या तरुणवर्गाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झाला असून, कोणताही व्यवसाय करताना त्याबाबत कमीपणा मानू नये अशी त्यांची मनोधारणा झाली आहे.

दोन-तीन दशकांपूर्वी गोव्यात मासळीचा पारंपरिक व्यवसाय तसेच विक्रीही केवळ विशिष्ट समाजातील व्यक्ती करायच्या परंतु, त्या समाजातील तरुणवर्गाने कालांतराने अन्य प्रकारचे नोकरी-व्यवसाय करणे सुरू केल्याने समुद्रातून अथवा नदीतून मासळी काढण्याबाब मनुष्यबळाची टंचाई भासू लागली. त्याचाच लाभ उठवत परप्रांतीय लोक का व्यवसायात उतरले. काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली की मासेमारीचा व्यवसाय करणारी व्यक्ती तेवढी गोमंतकीय व त्याच्याकडे काम करणारे जवळजवळ सर्वच्या सर्व कामगार मूळचे परप्रांतीय अशी परिस्थिती निर्माण झाली. हळूहळू ते परप्रांतीय कामगार मासळीची विक्री गावोगावी सायकलने अथवा स्वयंचलित दुचाकी वाहनाच्या करू लागले. गेल्या कित्येक वर्षांपासून गोव्यात ती परिस्थिती आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी गोव्यातील शहरी बाजारपेठांतील तसेच गावोगावाचा मासळी विक्रीचा व्यवसाय पाहिल्यास प्रामुख्याने हा व्यवसाय परप्रांतीय लोकांकडेच आहे असे आढळून येते. मोठमोठ्या हॉटेल्सना मासळी पुरवण्याचा ठेकेदारी व्यवसाय तेवढा गोमंतकीयांच्या हातांत आहे.

शहरी भागांतील बाजारपेठांत मूळच्या गोमंतकीय महिला मासळी विक्री करीत असतात; तथापि, त्यांच्याकडे असलेली जवळजवळ सर्वच्या सर्व कामगार मंडळी परप्रांतीय असल्याचे दिसून येते. सध्या गावोगावी पायी चालत, सायकलने अथवा अन्य प्रकारच्या साहाय्याने मासळी विक्री करणाऱ्यांमध्ये परप्रांतीयच अधिकतर संख्येने आहेत.

ग्रामीण भागांत कार्यरत असलेले हे नवीन विक्रेते स्थानिकच असल्याने तेथील बहुतांश पंचायती सध्या मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून सोपो अथवा अन्य प्रकारचे शुल्क आकारत नाहीत. परंतु, अशा रस्त्यावरील काही विक्रेत्यांच्या विरोधात काहींच्या तक्रारी आहेत. अशा विक्रेत्यांमुळे पंचायतींचा महसूल बुडतो, सुरळीत वाहतुकीत व्यत्यय येतो, कराचा भरणा करणाऱ्या परिसरातील अन्य विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होतोय, अशा काही तक्रारी केल्या जातात.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या