कोलवाळ कारागृहात ‘कोरोना’ स्थिती बिकट

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

आतापर्यंत ८७ जण बाधित, १ जेलर, १२ तुरुंग कर्मचारी व ७४ कैद्यांचा समावेश

पणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कोरोनाच्या संसर्गामुळे स्थिती बिकट झाली आहे. या कारागृहामधील स्वयंपाकीच कोरोनाबाधित झाल्याने पर्यायी सोय नसल्याने प्रशासनासमोर संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत कारागृहात ८७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यामध्ये एक जेलर, १२ तुरुंग कर्मचारी व ७४ कैद्यांचा समावेश आहे. त्यातील २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाबाधितांना अलगीकरण करण्यासाठी तेथे वेगळ्या खोल्या नसल्यानेच इतर कैद्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले 
आहे.

गेल्या एक महिन्यापासून कारागृहात कोरोना संसर्ग वाढत आहेत. कारागृहातील स्वयंपाकाचे काम करणाऱ्या ४० कैदीपैकी १२ जण हे कोरोना पोझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणारे इतर कैदी स्वयंपाक करण्यास तयार नाहीत. सध्या कारागृहात ४०० पेक्षा अधिक कैदी आहेत. शिक्षा भोगत असलेल्या सुमारे ७० हून अधिक आरोपींना कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर पॅरोलवर त्यांची सुटका करण्यात आली आहे. कारागृहात हा संसर्ग फैलावत असल्याने कच्च्या कैद्यांनीही जामिनासाठी अर्ज केला होता मात्र तो अमान्य करण्यात आला आहे. स्वयंपाकी असलेले कैदीच कोरोनाबाधित झाल्याने काहींनी कारागृह प्रशासनाकडे त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यास तसेच सामान स्वीकारण्यास परवानगी द्यावी यासाठीची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीच व्यवस्था केली जात नसल्याने कैद्यांमध्ये कोरोना फैलावाबाबत भीती निर्माण झाली आहे. 

कारागृहात नवीन कोरोनाबाधित सापडत असले तरी तेथे आरोग्यासंदर्भात कोणतीच व्यवस्था केली जात नाही. एरव्ही कोरोनाबाधित कोणी सापडल्यास तेथील परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाते मात्र या कारागृहात एकदाच निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला डॉक्टरही उपचारासाठी येत नाही. सकाळी आल्यानंतर तो दिवसभर गायबच असतो. सहाय्यक अधीक्षकांचेही या कारागृहाकडे दुर्लक्ष होत असल्याने कैद्यांमध्ये या अधिकाऱ्याबाबत संताप आहे.

संबंधित बातम्या